विवाहितेचा तीन महिन्यात खून : जावेला जन्मठेपेची शिक्षा

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

अंजनगाव तालुका माढा येथे दिनांक ०२/०२/२०२३ रोजी जाऊ उज्वला किरण पाडोळे रा. अंजनगाव तालुका माढा हिचा दागिने चोरल्याचा संशय व्यक्त केल्याने गळा दाबून खून केला व ती जळाली असे दाखवण्यासाठी तिला पेटवून दिले या आरोपावरून गीता शंकर पाडोळे राहणार अंजनगाव ता. माढा हिच्याविरुद्ध करण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी बार्शी येथील सत्र न्यायालयात होऊन न्यायाधीशानी आरोपीला खुनाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड, आणि पुरावा नष्ट करण्याच्या आरोपावरुन ३ वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

या दुर्दैवी खटल्याची हकीकत अशी की मयत उज्वला हिचा खुन लग्न झाल्यापासून दोन महिन्याच्या आत झाला होता. तिचे लग्न दिनांक २९/११/२०२२ रोजी किरण लक्ष्मण पाडोळे यांच्याबरोबर झालेले होते. तिच्या घरी तिचा पती किरण, दीर शंकर, त्याची बायको आरोपी गीता, सासू-सासरे असे राहत होते. उज्वलाच्या लग्नात तिला आई-वडिलांनी सोन्याचे दागिने घातले होते. सदरचे दागिने तिने घरातील कपाटामध्ये ठेवलेले होते.

पहिल्या संक्रांती सणासाठी ती गड्डा यात्रे सोलापूरला आली होती. सासरी परत गेल्यानंतर तिच्या लक्षात आले की कपाटातील दागिने गायब झालेले आहेत. याबद्दल तिने आई-वडिलांना कळवले आणि जाऊ गीता हिच्याकडे याबाबत चौकशी केली. मयत उज्वला हि जाऊ आरोपी गीता हीच्याकडे वारंवार चौकशी करत असल्याने घटनेदिवशी आरोपी गीता हिने जाऊ उज्वला हिचा घरी कोणीही नसताना गळा दाबुन खून केला आणि ती भाजली असे दाखवण्यासाठी तिला पेटवून दिले असा आरोप गीता हिचेवर होता. याप्रकरणी मयत उज्वला हिचे वडील सिध्देश्वर चांगदेव जाधव यांनी माढा पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली होती. खटल्यात सुनावणी दरम्यान मयताचे शव विच्छेदन करणारे आणि आरोपी गीता हिच्या अंगावरील जखमाबाबत वैद्यकीय तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. सदानंद व्हनकळस यांची महत्त्वपूर्ण साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली.

 

याप्रकरणी न्यायालयात सरकारतर्फे ॲड. दिनेश देशमुख, मूळ फिर्यादी मयताचे वडिलातर्फे ॲड. धनंजय माने तर आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले.

कोणत्याही प्रकारचा नेत्र साक्षीदार नसताना देखील केवळ आरोपीविरुद्ध असलेला भरभक्कम परिस्थितीजन्य पुरावा व वैद्यकीय पुरावा यावरून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होण्याची ही दुर्मिळ घटना.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!