माऊली मृत्यूशी झुंज हरला, प्रेम प्रकरणातून झाली होती मारहाण, आई-वडिलांचा आक्रोश..

सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील बीड आणि लातूर धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांना ऊत आलं आहे. धाराशीव मध्ये प्रेम प्रकरणातून भूम तालुक्यात एका १८ वर्षीय तरुणास क्रूरतेचा कळस गाठत सात ते आठ जणांनी रॉड, काठी तसेच तीक्ष्ण हत्याराने मारहाण केली होती. जखमी अवस्थेत तरुणाला सोलापूरमधील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. माऊली बाबासाहेब गिरी असे तरुणाचे नाव होते.
रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास माऊलीची प्राणज्योत मालवली. आई-वडिलांना एकुलता एक असणाऱ्या माऊलीच्या मृत्यूने आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मृत घोषित करताच आई वडिलांनी एकच हंबरडा फोडला. माऊलीच्या आई-वडिलांचा आक्रोश पाहून रुग्णालयातील इतर नागरिकांना दुःख अनावर झाले होते.
अखेर माऊलीची मृत्यूशी झुंज अपयशी
माऊलीच्या वडिलांनी परंडा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, ३ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास माऊलीचा परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील सतीश जगताप आणि इतर सहा ते सात जणांनी लोखंडी रॉड, काठीने जबर मारहाण केल्याचा फोन आला होता. माऊलीचे वडील बाबासाहेब गिरी यांनी अश्विनी हॉस्पिटल मध्ये उपचारसाठी दाखल केल्या पासून देवाकडे प्रार्थना करत होते. परंतु १६ मार्च रोजी रविवारी सकाळी माऊलीने प्राण सोडले.