
सोलापूर : प्रतिनिधी
यात हकीकत अशी की, मद्य विक्री परवान्याचे नूतनीकरण करून देतो, तसेच ते विकून आठ ते दहा कोटी रुपये मिळवून देतो, असे आमिष देत तावरे पितापुत्रांनी एकाला दीड कोटी रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी अहिल्यानगरच्या दोघांवर जेलरोड पोलिसांत सोमवारी दुपारी गुन्हा नोंद झाला आहे. मोहन शिवाजी तावरे व श्याम मोहन तावरे (रा. पिसोरा बु, श्रीगोंदा जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत युवराज कोंडीबा सरवदे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना ०८ ऑगस्ट २०२२ ते ०६ जून २०२४ पर्यंत राजेंद्र चौक कामगार कल्याण केंद्राजवळ सोलापूर या ठिकाणी घडली आहे.
यातील फिर्यादी युवराज सरवदे व आरोपी तावरे यांची दहा वर्षापासूनची ओळख होती. सरवदे यांस कर्ज हवे असल्याने दोघा पितपुत्रांनी सरेंडर केलेले विदेशी मद्य विक्री परवाना, वाइन शॉप परवाना मुंबई मंत्रालयातून नूतनीकरण करून देतो, तसेच ते विकून सुमारे १० कोटी रुपये मिळतील, असे आमिष दाखवले. युवराज सरवदे आणि त्यांचे नातेवाईक हरीष वाघमारे यांच्याकडून एकुण १ कोटी ५५ लाख ३२ हजार ५०० रुपये घेतले. मात्र, परवाना दिला नाही, पैसेही परत दिले नाही, याबाबत फिर्यादी यांनी जेलरोड पोलीस स्टेशन येथे आरोपीचे विरोधात भा.द.वि. ४२०, ४०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
तदनंतर यातील दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळावा याकरिता सोलापूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश कटारीया साहेब यांचे कोर्टामध्ये अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केलेला होता. सदरच्या जामीन अर्जास मुळ फिर्यादीचे वतीने जामीन अर्जाबाबत लेखी हरकत घेण्यात आलेली होती. तसेच सरकार पक्षाच्या वतीने केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन यातील दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मे. न्यायालयाने फेटाळला. यात आरोपीचे वतीने अॅड.एस.एस. उंबरजे, सरकार पक्षाचे वतीने अॅड. पी. एस. जन्नू तर मुळ फिर्यादीचे वतीने अॅड. रविराज दि. सरवदे व अॅड. सत्यजित वाघमारे यांनी काम पाहिले.