सोलापूर (प्रतिनिधी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि मंच, सोलापूरच्या वतीने नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या कथित मनुवादी भूमिकेचा जाहीर निषेध नोंदवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात आज जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळण्यात आल्याचा आरोप पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यावर करण्यात आला असून, ही बाब लोकशाही मूल्यांना बाधा आणणारी असल्याचे मंचचे म्हणणे आहे.

तसेच तपोवन जंगलातील वृक्षतोड प्रकरणी भूमिका मांडणाऱ्या वन अधिकारी संगिता जाधव यांच्यावर प्रशासनाकडून कोणतीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कारवाई करण्यात येऊ नये, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जर जाधव यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि मंच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि मंचचे अध्यक्ष अॅड. शताब्दीकुमार मधुकर दोडयानुर, ज्येष्ठ सदस्य अॅड. संजीव सदाफुले, अजय रणशृंगारे, उपाध्यक्ष विक्रम वाघमारे, कार्याध्यक्ष रविराज सरवदे, सचिव दीपक हुलसुरे, प्रथम गायकवाड यांच्यासह अॅड. राहुल गायकवाड, अॅड. जयप्रकाश भंडारे, अॅड. राजरत्न बनसोडे, अॅड. सत्यजित वाघमारे, अॅड. विशाल मस्के, राज दोडयानुर व मंचचे अन्य सदस्य उपस्थित होते.
संविधानिक मूल्यांचे रक्षण आणि पर्यावरण संरक्षणासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी विधि मंचच्या वतीने करण्यात आली.
