सोलापूर : प्रतिनिधी
बाळे येथील आदि जांब मुनी मराठी शाळा व कै. काशीबाई शंकरराव इंडे हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जितेंद्र टेंभुर्णीकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे युवा नेते अजिंक्य टेंभुर्णीकर, अमर कुलकर्णी तसेच ‘पुण्यनगरी’चे उपसंपादक भरतकुमार मोरे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिकात्मक प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहन झाले. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोषकुमार घोडके यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या संविधानिक मूल्यांचे महत्त्व विशद करत शाळेतील विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली.

यानंतर बालवाडीपासून इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व व भारतमातेविषयी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सौ. प्रतिभा सावंत यांनी स्वातंत्र्यापासून आजपर्यंतच्या भारताच्या प्रगतीचा आढावा घेतला.

कार्यक्रमात ATS प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल त्यांचे सर्व मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी ऐश्वर्या जवळगी व रमा गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमा गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

या यशस्वी कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विश्वास गजभार, श्री. गोवर्धन माने, देविदास माने यांच्यासह शिक्षिका गीतांजली कोल्हे, शिवकांता सुरवसे, जनाबाई कोथिंबीर, सोनाली जगताप, रेश्मा शेख, अक्षयता नराळे, प्रतिभा सावंत, ओतारे मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी अंकुश हिरेमणीकर व मंगल माने यांनी विशेष परिश्रम घेतले.

