सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरच्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा सोलापूर बार असोसिएशनतर्फे तीव्र निषेध

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

भारत देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सरन्यायाधीश श्री. भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या प्रयत्नाचा सोलापूर बार असोसिएशनतर्फे आज तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बार असोसिएशनतर्फे तातडीची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.

ही सभा सकाळी 11 वाजता बार असोसिएशन हॉलमध्ये झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव होते, तर सभेचे प्रस्ताविक उद्गार सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे यांनी काढले. त्यांनी या घटनेमुळे संपूर्ण वकिली व्यवसायावर डाग लागल्याचे नमूद करत, या कृत्याचा सर्वतोपरी निषेध करण्याचे आवाहन केले.

सभेदरम्यान ॲड. रविराज सरवदे, ॲड. संजय गायकवाड, ॲड. मळसिद्ध देशमुख, ॲड. व्ही.पी. शिंदे, ॲड. आकाश माने, ॲड. अजय रणशुंगारे, ॲड. बापूसाहेब देशमुख, ॲड. संजीव सदाफुळे, ॲड. बापूसाहेब गायकवाड, ॲड. शरद पाटील आणि ॲड. भारत कट्टे यांनी या घटनेचा निषेध नोंदवत आपली मते मांडली.

बारचे उपाध्यक्ष ॲड. रियाज शेख यांनी या घटनेचा निषेध करत न्यायसंस्थेवरील विश्वास अबाधित ठेवण्याचे आवाहन केले. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे विद्यमान सदस्य ॲड. मिलिंद थोबडे यांनी म्हटले की, “अशा प्रकारच्या घटना वकिल समाजाच्या सन्मानाला धक्का देणाऱ्या आहेत. संपूर्ण वकिल समाजाने एकजुटीने या प्रवृत्तींचा विरोध करणे आवश्यक आहे.”

अध्यक्षीय भाषणात ॲड. बाबासाहेब जाधव म्हणाले, “वकील हा न्यायप्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे. सरन्यायाधीशांवर हल्ला करणे म्हणजे न्यायसंस्थेवरच हल्ला आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो.”

सभेच्या शेवटी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला की —

सोलापूर बार असोसिएशन तर्फे माननीय सरन्यायाधीश श्री. भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात येतो व या घटनेबाबत अधिकृत निवेदन बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा तसेच बार कॉन्सिल ऑफ इंडिया यांना पाठविण्यात यावे.

सभेचे सूत्रसंचालन सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन खजिनदार ॲड. अरविंद देडे यांनी मानले. सभेच्या शेवटी सर्व वकिलांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबद्दल आदर व्यक्त करत, न्यायसंस्थेच्या सन्मानाचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!