सोलापूर (प्रतिनिधी)

भारतीय राजकारण आणि भारतीय इतिहासाची मांडणी करणारे राष्ट्रीय वक्ते पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ सोलापूरमध्ये प्रथमच येणार असून महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने रविवार दि. 7 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.25 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात भारत का भविष्य या विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजी नगरचे देवगीरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर दादा शितोळे हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. अशी माहिती अध्यक्षा रेणुका महागांवकर, कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली.

राष्ट्रप्रेमी आणि स्वदेशीचा पुरस्कार करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजीव दिक्षित यांच्या नंतर परखडपणे आपले मत मांडणारे म्हणून ज्यांची ख्याती आहे असे ज्येष्ठ पत्रकार तथा अखंड हिंदु राष्ट्राचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील असलेले सामाजिक कार्यकर्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलीगढ मध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण अलीगढमध्ये झाले तर अलीगढ मुस्लीम विद्यापीठातून त्यांनी पॉलीटिकल सायन्य ही पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारीतेचे शिक्षण घेवून अनेक प्रसार माध्यमांमध्ये काम केले. पाकिस्तानातील आज टिव्हीचे ते भारतातील प्रतिनिधी म्हणूनही अनेक वर्षे काम केले.

प्रेस क्लब ऑफ इंडियाचे ते अनेक वर्ष सरचिटणीस म्हणूनही सेवा बजावली केंद्रातील सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. तसेच प्रसार माध्यमांवरील चुकीच्या कायद्याविरूध्द त्यांनी युपीए सरकार विरूध्द आवाज उठवला होता. ते राष्ट्रीय स्तरावरील हॉकी खेळाडू आहेत. देशातील लिबरल्स विचारांचा पडदापाश त्यांनी अनेकवेळा केला. राष्ट्रप्रथम ही भावना घेवून त्यांनी दिल्लीच्या रामलिला मैदानात अनेक व्याख्याने केली त्याला लोकांनी मोठी गर्दी केली. संपूर्ण देशभरात ते व्याख्यानाच्या माध्यमातून देशातील जनतेला जागृत करण्याचे काम करत आहेत. त्यांनी मुस्लीम धर्मियांचा ग्रंथ कुराणचाही अभ्यास केला आहे. देशाला अखंड हिंदु राष्ट्र करण्याचा त्यांचा प्रयत्न वेळोवेळी सुरू आहे. त्यांच्या वैचारीक आणि बौध्दिक व्याख्यानाचा लाभ सोलापूरकरांना व्हावा या हेतुने महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने भारत का भविष्य या विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दि. 7 डिसेंबर 2025 रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात तरूण तरूणींनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा तसेच सभागृहातील पहिल्या तीन रांगा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. असे सांगण्यात आले. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरीकांनी मोठ्यासंख्येने उपस्थिती राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष प्रा.दीपक देशपांडे, कार्यवाह जितेश कुलकर्णी,कोषाध्यक्ष अमोल धाबळे, कार्यकारणी सदस्य प्रकाश मोकाशे, पृथा हलसगीकर, मेधा कुलकर्णी, अविनाश महागांवकर, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर आदी कार्यरत आहेत. व्याख्यानाला येणार्या नागरीकांच्या सोईसाठी हुतात्मा स्मृती मंदिराच्या आवारात स्क्रीन, खुर्च्या आणि स्पिकरची व्यवस्था करण्यात आली आहे.
