सोलापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक निर्देशानुसार आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व एन ए बी संचलित निवासी अंध कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगासाठी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिरात मार्गदर्शन करताना लोकभीरक्षक देवयानी किणगी यांनी सांगितले की, दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, रोजगार, आरोग्य, सामाजिक सुरक्षा, आरक्षण व सन्मानाने जगण्याचा अधिकार कायद्याने प्राप्त झाला आहे. शासकीय कार्यालये, शाळा, रुग्णालये व सार्वजनिक ठिकाणी सुगमतेच्या सुविधा देणे बंधनकारक असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच दिव्यांग व्यक्तींवर होणारा भेदभाव, छळ अथवा हक्कांपासून वंचित ठेवण्याचे प्रकार हे शिक्षेस पात्र गुन्हे असल्याची माहिती दिली.

लोकभीरक्षक शिवकैलास झुरळे यांनी दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या विविध शासकीय योजना, प्रवास सवलत, शैक्षणिक व रोजगार सवलती यासंदर्भातही सविस्तर मार्गदर्शन केले.
शिबिरात उपस्थित दिव्यांग प्रशिक्षणार्थीनी आपल्या अडचणी व प्रश्न मांडले. प्रश्नोत्तर सत्रात कायदेविषयक तज्ञ देवयानी किणगी, शिवकैलास झूरळे, अनुराधा कदम यांनी योग्य कायदेशीर उपाय सुचवले. तसेच गरजू दिव्यांग व्यक्तींना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत मोफत कायदेशीर मदत उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.
या प्रसंगी व्यासपीठावर अंकुश कदम, रामचंद्र कुलकर्णी, लोकभीरक्षक देवयानी किणगी, अनुराधा कदम, शिवकैलास झूरळे, स्वप्नील मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. येवेळी विधिज्ञा अनुराधा कदम, स्वप्नील मोरे व दिव्यांगानी मनोगत व्यक्त केले.

या शिबिराच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींमध्ये कायदेविषयक जागरूकता वाढवणे, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे व आत्मविश्वास निर्माण करणे हा उद्देश यशस्वीरीत्या साध्य झाला, अशी भावना एन. ए बी संचलित निवासी अंध कार्यशाळा केंद्राचेमुख्य रामचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचान्यांनी व एन ए बी संचलित निवासी अंध कार्यशाळे चे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
