सोलापूर : प्रतिनिधी
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वित्त समितीवर सोलापूरचे प्रख्यात चार्टर्ड अकाउंटंट सी.ए. राजगोपाल मिणियार यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रतिष्ठित पदासाठी झालेल्या बैठकीत ही नियुक्ती अधिकृतरीत्या जाहीर झाली.
मिणियार हे मागील साडेचार वर्षांपासून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे वित्तीय सल्लागार म्हणून कार्यरत असून, त्यांच्या काटेकोर आर्थिक नियोजनामुळे व पारदर्शक कार्यपद्धतीमुळे त्यांना आता वित्त समिती सदस्य म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने ही निवड झाल्याचे मिणियार यांनी सांगितले. त्यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल न्यासाचे आभार मानले असून, “श्रीराम मंदिराच्या कार्यात अधिक समर्पणाने योगदान देण्याचा माझा संकल्प आहे,” असे ते म्हणाले.
सोलापूरच्या व्यावसायिक व धार्मिक वर्तुळातून या नियुक्तीबद्दल सी.ए. राजगोपाल मिणियार यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
