सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेमार्फत सोलापूर शहरातील विविध चौक आणि रस्ते दुभाजक यांच्या सौंदर्यवर्धन, विकास व नियमित देखभाल यासाठी सामाजिक संस्था, संघटना, व्यापारी प्रतिष्ठाने, औद्योगिक कॉर्पोरेट कंपन्या, हॉटेल्स, कॉलेजेस, बँका आदी इच्छुक घटकांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
महानगरपालिकेच्या “सुंदर सोलापूर” या उपक्रमांतर्गत सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्य वाढविणे, पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देणे आणि शहराचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. इच्छुक संस्थांनी निवडलेल्या ठिकाणी फुलझाडे, गवत, सजावट, स्वच्छता व प्रकाशयोजना यांसह देखभाल करावी लागणार आहे. या ठिकाणी संस्थेचे नाव असलेले फलक बसविण्याची परवानगी दिली जाईल.

सदर कामकाज सोलापूर महानगरपालिकेच्या अटी व शर्तींनुसार पार पाडण्यात येईल. इच्छुकांनी सविस्तर माहिती व अर्जाचा नमुना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर
www.solapurcorporation.gov.in येथे पाहता येईल. प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख ४ नोव्हेंबर २०२५ ते १८ नोव्हेंबर २०२५ अशी असून, प्रस्ताव महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे सादर करावेत.महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचे सौंदर्य वाढविण्याचा हा उपक्रम राबविण्यात येत असून, सोलापूरकर नागरिक, उद्योगसंस्था, तसेच सामाजिक संस्था यांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
