सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज जन्म–मृत्यू आणि विवाह नोंदणी कार्यालयाची पाहणी करून प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेतला. कामकाजात अनावश्यक विलंब होत असल्याची नोंद घेत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे कडक आदेश दिले.

आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले की, नागरिकांच्या मूलभूत सेवांशी संबंधित नोंदणी प्रक्रियेत कोणताही विलंब सहन केला जाणार नाही. “निपटारा वेळेत न केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई होईल,” असा इशारा त्यांनी दिला.

पाहणी दरम्यान आयुक्तांनी अभिलेखापाल कार्यालयालाही भेट देऊन रजिस्टर, नोंदी, फाईल प्रक्रियेची माहिती घेतली. दस्तऐवजांचे व्यवस्थापन, नोंदणीचा वेग, कार्यालयातील दैनंदिन कार्यप्रणाली याचा त्यांनी आढावा घेत सुधारणा करण्यासंबंधी सूचना दिल्या.

या पाहणीत उपायुक्त आशिष लोकरे, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, तसेच डॉ. मंजिरी कुलकर्णी उपस्थित होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामकाजात पारदर्शकता व गती वाढविण्याबाबत पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका मांडली.

आयुक्तांच्या या दौऱ्यामुळे जन्म–मृत्यू व विवाह नोंदणी विभागातील कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असून नागरिकांना वेळेत, अचूक आणि विलंबमुक्त सेवा मिळण्यास हातभार लागणार आहे.
