सोलापूर : प्रतिनिधी
लक्ष्मी–विष्णू चाळ परिसरात आज सकाळी पाण्याच्या गोंधळाने एक तरुणाचा जीव घेतला. कमी प्रेशरमुळे विद्युत मोटर लावून पाणी भरत असताना पंकज कांबळे (19) या युवकाला अचानक करंट लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. क्षणात परिसरात हळहळ पसरली तर दुसरीकडे नागरिकांचा संताप भडकला.
घटनेनंतर पंकजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. मात्र तेथे तरुणांनी निषेधाची भूमिका घेतली. “महापालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे हा मृत्यू झाला. जबाबदार अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करा, अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही,” असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राहुल काटे यांनी दिला.

🔹 पाणीपुरवठ्यातील बदलांनी वाढवल्या समस्या
गेल्या दहा वर्षांत लक्ष्मी–विष्णू चाळीत पाणीपुरवठ्याची कोणतीही अडचण नव्हती. मात्र अलीकडे महापालिकेने मेन लाईनवरून रेल्वे, रामवाडी, इंद्रधनू अशा विविध भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी नवी पाइपलाइन जोडली. त्यामुळे चाळीत पाण्याचा प्रेशर मोठ्या प्रमाणात घटला, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
“विहिरीच्या पाण्यावर आमचा सारा कारभार चालायचा; कधी टँकरची गरज पडली नाही. पण अधिकाऱ्यांनी मंजुरीशिवाय केलेल्या पाइपलाइन जोडणीमुळेच आज एका गरीब कुटुंबाचा मुलगा मृत्युमुखी पडला,” असा आरोप भाजप नेते व माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी केला.

🔹 संतापाचा उद्रेक – मृतदेह महापालिकेत नेण्याची चर्चा
पंकजचा मृतदेह मिळाल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक व स्थानिक युवक मोठ्या संख्येने रुग्णालयात जमा झाले. जबाबदार अधिकाऱ्यावर तात्काळ कडक कारवाई झाल्याशिवाय मृतदेह हलवणार नाही, असा निर्णय युवकांनी घेतला.
या घटनेने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून महापालिका प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
