नई जिंदगी चौकातील खून प्रकरण; आरोपी मुस्ताक नासीर पटेलला जन्मठेपेची शिक्षा

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर येथील नई जिंदगी चौकात 2020 साली भरदिवसा झालेल्या खून प्रकरणातील आरोपी मुस्ताक नासीर पटेल (वय 36, रा. सिध्देश्वर नगर, भाग 4) यास जन्मठेप आणि 5,000 रुपये दंड अशी कठोर शिक्षा अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. प्रशांत पी. राजवैद्य यांनी शुक्रवारी ठोठावली. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अन्वये आरोपीस चार महिन्यांचा कारावास व 1,000 रुपयांचा दंड अशी अतिरिक्त शिक्षा देण्यात आली.

घटनेची पार्श्वभूमी

12 जून 2020 रोजी सकाळी 10.45 च्या सुमारास नई जिंदगी चौकात अमन चौक–मजरेवाडी रोडवरील पठाण हॉटेलसमोर आरोपी मुस्ताक पटेल व मयत शकिल शमशोददीन पटेल यांच्यात वाद झाला. “आपल्या मुलांवर खोटे गुन्हे का करता?” असा जाब शकिलने विचारताच संतापलेल्या मुस्ताकने कमरेत लपविलेला चाकू काढून शकिलवर सपासप एकूण 11 वार केले. छाती, पोट, पाठी आणि हातावरील गंभीर जखमांमुळे शकिलचा घटनास्थळी मृत्यू झाला. गुन्ह्याचे हत्यार आरोपीने जवळच्या गटारीत फेकून पळ काढला.

या प्रकरणी मयताचा भाऊ अलिमोददीन पटेल यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी घटना घडल्यानंतर स्वतः एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाल्याने त्यास अटक करण्यात आली.

न्यायालयातील सुनावणी

प्रकरणाची सुनावणी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश-3 यांच्या न्यायालयात झाली. सरकारतर्फे एकूण 14 साक्षीदार, तर बचाव पक्षाने 3 साक्षीदार तपासले.

सरकारी पक्षाचे युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदिपसिंग मो. राजपूत यांनी मांडले. त्यांनी तीन नेत्रसाक्षीदारांचे जुळणारे पुरावे, घटनास्थळावरील रक्ताचे नमुने, आरोपी व मयताच्या कपड्यांवरील रक्तचिन्हे आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू यांवरील फॉरेन्सिक अहवाल न्यायालयासमोर मांडले. शवविच्छेदन अहवालातील 11 खोल चाकू जखमा नेत्रसाक्षीला पूरक असल्याचेही त्यांनी दाखवून दिले.

सर्व पुरावे विश्वासार्ह असल्याचे मान्य करून न्यायालयाने आरोपीला कलम 302 अन्वये दोषी ठरविले.

खटल्यात सहभागी अधिकारी

सरकारी वकील : डॉ. प्रदिपसिंग मो. राजपूत

आरोपीचे वकील : अॅड. यू. डी. जहागीरदार

तपास अधिकारी : पोलीस निरीक्षक श्री. हेमंत शेंडगे

कोर्ट पैरवी : महिला पोलीस हवालदार श्रीमती एस. एस. घाडगे

पोलीस ठाणे : विजापूर नाका पोलीस ठाणे

28 नोव्हेंबर 2025 रोजी या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!