सोलापूर : प्रतिनिधी
28 नोव्हेंबर 2025 जगदंब बहुउद्देशीय संस्था मार्फत श्रीविजय यादव व मल्लिकार्जुन पाटील यांनी उद्यान विभाग सोलापूर व केतन शहा यांना निवेदन देण्यात आले होते. शहरातील संगमेश्वर कॉलेज समोरील मैदान, पेन्शन ऑफिस बाजू, स्मशानभूमी पाठीमागील परिसरातील वृक्षा भोवती बसविण्यात आलेली लोखंडी संरक्षित जाळी झाडाच्या खोडात घट्ट घुसल्याने झालेल्या नुकसाना बाबत दाखल करण्यात आलेल्या निवेदनाची महानगरपालिका उद्यान विभागाने तातडीने दखल घेतली आहे.

निवेदनातील छायाचित्रे आणि प्रत्यक्ष पाहणीतून झाडाची स्थिती धोकादायक असल्याचे पुष्टी झाल्यानंतर उद्यान विभागाच्या पथकाने तात्काळ त्या ठिकाणी भेट देऊन झाडाभोवती घट्ट अडकलेली लोखंडी संरक्षित जाळी पूर्णपणे काढून टाकली. यामुळे झाडाच्या वाढीतील अडथळा दूर होऊन त्याचे पुढील संरक्षण शक्य झाले आहे.

परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि पर्यावरण रक्षणाचा विचार करून करण्यात आलेली ही जलद कार्यवाही कौतुकास्पद आहे. भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्यात आल्या असल्याची माहितीही उद्यान विभागाकडून देण्यात आली.

निवेदनाची तातडीने दखल घेऊन अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही केल्याबद्दल उद्यान विभागाचे मन:पूर्वक आभार संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.

