सोलापूर : प्रतिनिधी
संत श्री शितोळे बाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे श्री दत्त जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही घाटकोपर, मुंबई येथून अक्कलकोट पर्यंत भव्य पायी दिंडी व पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भक्ती, प्रेरणा आणि श्रध्देने नटलेल्या या पदयात्रेत शेकडो भाविक सहभागी होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर उमा नगरीतील रहिवासी व प्रसिद्ध मूर्तिकार प्रकाश माने यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ पादुका आगमन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. पादुका व पालखीचे आगमन होताच परिसरात “जय जय स्वामी समर्थ”च्या गजरांनी वातावरण भक्तिमय झाले. अनेक भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

या सोहळ्याबाबतची माहिती प्रकाश माने, सविता माने आणि सोनाली टेकाळे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, पालखीचे आगमन हा उमा नगरी परिसरासाठी अभिमानाचा क्षण असून दरवर्षी वाढती भक्तांची उपस्थिती हे श्रद्धेचे प्रतीक आहे.
या प्रसंगी प्रकाश माने व आनंद टेकाळे परिवार यांच्या वतीने सुमारे 250 भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी भजन, नामस्मरण आणि कीर्तनाद्वारे सोहळ्यात उत्साहाने सहभाग नोंदवला.

श्री दत्त जयंती आणि अक्कलकोट यात्रेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भक्तिमय सोहळ्यामुळे उमा नगरी परिसरात अध्यात्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
