सोलापूर : प्रतिनिधी
जुळे सोलापूर येथील किड्स वर्ल्ड स्कूलचे दहावे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व जल्लोषात हुतात्मा स्मृती मंदिर येथे पार पडले. विद्यार्थ्यांच्या बहारदार सांस्कृतिक सादरीकरणा मुळे संपूर्ण सभागृह दणाणून गेले होते.

या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा संस्थेचे आधारस्तंभ दिलीप कोल्हे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास वैद्यकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यामध्ये डॉ. सिद्धांत गांधी (ई.सी.एस. हॉस्पिटल, भैय्या चौक), संस्थेचे प्रमुख सुभाष कदम व अशोक पाटील, मेस्टा असोसिएशनचे अध्यक्ष हरीश शिंदे, तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे संस्थापक व मुख्याध्यापक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये एस.पी. पब्लिक स्कूल, सनराइज पब्लिक स्कूल, महात्मा फुले प्राथमिक शाळा, जिजाऊ गुरुकुल, ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूल, ग्रेस किड्स व सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल आदी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात भरतनाट्यम नृत्याने झाली. त्यानंतर विविध मराठी, देशभक्तीपर, भक्तीपर तसेच ‘शिवशंभुचा छावा’ या लोकप्रिय चित्रपटातील गाण्यांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला पालकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.

विशेष आकर्षण ठरले मराठी हास्यजत्रा फेम कलाकार श्री. अरुण कदम यांचे विनोदी सादरीकरण, ज्यामुळे कार्यक्रमाला अधिकच रंगत आली.
पालकांचा प्रचंड प्रतिसाद लाभल्याने हुतात्मा स्मृती मंदिर खचाखच भरले होते व अनेक पालकांना उभे राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा लागला.

या यशस्वी आयोजनासाठी स्कूलच्या प्राचार्या मा. सौ. स्नेहा संदीप पाटील व सर्व शिक्षकवृंदाने अथक परिश्रम घेतले. संस्थेचे संस्थापक श्री. संदीप पाटील व सौ. स्नेहा पाटील यांनी संस्थेच्या दहा वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. प्रिया कौशिक व नम्रता मॅडम यांनी केले.

दहाव्या वर्धापनदिनानिमित्त साजऱ्या झालेल्या या स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून दिले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
