सोलापूर : प्रतिनिधी
“विद्यार्थिनींनी स्वतःचा स्वीकार करून स्वतःवर विश्वास ठेवावा. व्यावहारिकतेसोबतच नैतिकतेची शिस्त अंगी बाणवून आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द ठेवावी,” असा प्रेरणादायी संदेश मुंबई येथील प्रसिद्ध नेतृत्व विकास तज्ज्ञ आणि ‘पेंट इंडस्ट्री’मध्ये निवड झालेल्या पहिल्या महिला सौ. प्रिया सावंत यांनी दिला.
सेवासदन प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा नुकताच हुतात्मा स्मृती मंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून सावंत बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री होत्या.
कौशल्य आणि नावीन्यतेचा गौरव
शाळेच्या प्रगतीचे आणि विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक करताना सावंत यांनी शाळेच्या उपक्रमांमधील नावीन्यता आणि कौशल्य विकासाचा विशेष उल्लेख केला. यावेळी त्यांनी पुढील वर्षीपासून अष्टपैलू विद्यार्थिनीसाठी ‘शरदिनी पुरस्कार’ आणि आदर्श विद्यार्थिनीसाठी ‘कृष्णकमल पुरस्कार’ त्यांच्यातर्फे देण्याचे जाहीर केले.
कार्यक्रमाचे एक मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थिनी व शिक्षकांनी तयार केलेल्या ‘व्हिजन’ या हस्तलिखिताचे डिजिटल उद्घाटन. विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित या अंकात स्टेमसेल थेरपी, एआय, रोबोट डॉक्टर आणि हायड्रोजन फ्युएल यांसारख्या विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. हे हस्तलिखित क्यूआर कोड आणि लिंकद्वारे उपस्थितांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी संध्या सुतार, स्मिता कोर्टीकर, सौ. गीतांजली पेशवे, प्रणोती रायखेलकर, अमित देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रांत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. यामध्ये अष्टपैलू विद्यार्थिनी: कु. तनया देशपांडे, आदर्श विद्यार्थिनी कु. प्रियदर्शनी गुंड तसेच खेळ, निबंध, वक्तृत्व आणि हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. शिक्षक प्रतिनिधी मीरा जमादार यांनी शाळेचा वार्षिक अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाची सुरुवात गायन शिक्षक श्री. विलास कुलकर्णी आणि विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ‘पंचतुंड नर रुंद मालधर’ या नांदीने झाली. त्यावर कु. वीरा रजपूत हिने नृत्य सादर केले. त्यानंतर ‘गगन सदन’, ‘शंकरा रे शंकरा’, देवीचे नृत्यगीत, पावसाचे गाणे आणि विशेषतः ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ या गीतांवरील नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकली
या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष शीला मिस्त्री ,सचिव वीणा पतकी, शाळा समिती अध्यक्षा विद्या लिमये, कनिष्ठ महाविद्यालय शाळा समितीचे अध्यक्ष डॉ श्रीकांत येळेगावकर, कार्यकारिणी सदस्य पद्माकर कुलकर्णी, मुख्याध्यापिका. राजेश्री रणपिसे, उपमुख्याध्यापिका सौ. नंदिनी बारभाई, पर्यवेक्षिका स्वाती पोतदार, तसेच माजी सहसचिव केदार केसकर, माजी उपमुख्याध्यापिका लता पोटफोडे, दिपाली गोन्यल, श्री. अंकलगीकर,माजी शिक्षक अरुण पोरे, अंजली सुपेकर व माजी ग्रंथपाल वैजयंती दिंडोरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका रणपिसे यांनी केले, तर पाहुण्यांची ओळख संगीता नगरकर यांनी करून दिली. सूत्रसंचालन अश्विनी वाघमोडे, कु. तनया देशपांडे व कु. आर्या सुरडे यांनी केले. आभार सांस्कृतिक समिती प्रमुख सौ. रूपाली पवार यांनी मानले. वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.
