सोलापूर : प्रतिनिधी
खुनाच्या प्रकरणात जेलबंद असलेल्या नवऱ्यापासून घटस्फोट मिळावा यासाठी बायकोने नवऱ्याविरुध्द सोलापूर दिवाणी न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच खटला आहे.

दिनांक २७/०४/२०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बायकोला नांदायला पाठवत नसल्याच्या कारणावरुन सासु-सासरे बंगल्याच्या पोर्चमध्ये झोपलेले असताना आरोपीने त्यांच्यावर चाकुने हल्ला केला व सासऱ्याचा खून केला आणि सासु व मेव्हण्यावर चाकूने वार करुन त्यांचा खून केल्याचा प्रयत्न केला या आरोपावरुन मोहोळ पोलिसांनी आरोपीला दि. २७/०४/२०२५ रोजी अटक केली. तेंव्हापासून तो कारागृहात बंदीवासात आहे.

आमचे लग्न सन २०२१ साली झाले. लग्नानंतर नवऱ्याने माहेरवरुन पैसा घेऊन येण्याच्या कारणावरुन शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. दि. १५/०७/२०२२ रोजी मुलगा झाला. सन २०२३ च्या दिवाळीला आई माहेरला नेण्यासाठी आली असताना तिला देखील नवऱ्याने मारहाण केली व आम्हाला घरातुन हाकलून दिले. जानेवारी २०२४ मध्ये नवऱ्याने माहेरला येऊन आम्हाला मारहाण केली. नवऱ्याविरुध्द मी कौटूंबिक हिंसाचाराची केस केली. बाळाचा ताबा मिळावा म्हणून मोहोळ न्यायालयात अर्ज दाखल केला. कोर्टाने तो अर्ज मंजुर करुन बाळाचा ताबा माझ्याकडे द्यावा असा आदेश दिला तेव्हा नवरा बाळाला घेऊन कोर्टातून पळून गेला. दि. २७/०४/२०२५ रोजी नवऱ्याने माझ्या वडिलांचा खून केला. नवऱ्याने शारीरिक, मानसिक त्रास दिला व वडिलांचा खून केला. त्यामुळे नवऱ्याबरोबरचे नाते अस्तित्वात ठेवणे अशक्य आहे. त्यामुळे नवऱ्यापासून आपल्याला घटस्फोट मिळावा अशा आशयाचा घटस्फोट अर्ज बायकोने सोलापूर दिवाणी न्यायालयात दाखल केला आहे. सदर घटस्फोट अर्जाची सुनावणी न्यायाधिश संगिता वनकोरे यांच्या न्यायालयात होणार आहे.

या प्रकरणी बायकोतर्फे ॲड. अभय बिराजदार, ॲड. राहुल गायकवाड तर नवऱ्यातर्फे ॲड. जयदीप माने, ॲड. मनोज गिरी काम पाहत आहेत. नवऱ्याने देखील बायकोविरुध्द तिने नांदण्यास यावे म्हणून कौटूंबिक न्यायालयात दावा दाखल केला आहे. तो दावा कौटूंबिक न्यायालयात प्रलंबित आहे.
