मासिक पाळी नैसर्गिक ; बालविवाह अमानवी कृत्य राहुल बिराजदार यांचे प्रतिपादन

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

दि. २४ – येणाऱ्या भारताचे भवितव्य घडविणाऱ्या आजच्या बालिकेच्या हातात अभ्यासक्रमासोबत स्वतःच्या शरीराची, आरोग्याची व हक्कांची जाणीव जागृती करून देणे ही काळाची गरज आहे आणि मासिक पाळी नैसर्गिक असून बालविवाह हे अमानवी कृत्य असल्याचे प्रतिपादन लैंगिकता शिक्षण प्रबोधक राहुल बिराजदार यांनी प्रतिपादन केले.

राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी प्रशाला येथे आयोजित किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन, किशोरी आरोग्य, पोषक आहार, बालविवाह प्रतिबंध आणि शासकीय योजनांविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मासिक पाळी ही लाजेची गोष्ट नसून सृष्टीच्या नवनिर्मितीची नैसर्गिक प्रक्रिया आहे. बालविवाह हे बालिकेच्या शरीरावर अन्याय करणारे आणि समाजाच्या मानसिकतेवर गडद कलंक उमटवणारे अमानवी वास्तव आहे, असे मत राहुल बिराजदार यांनी मांडले.

किशोरी वयात योग्य पोषक आहार न मिळाल्यास शरीर व मन दोन्ही कमकुवत होते, याची जाणीव करून देत लोहयुक्त अन्न, हिरव्या पालेभाज्या, डाळी, फळे, दूध आणि पुरेसे पाणी पिण्याचे महत्त्व डॉ. सिद्धी चाकोते यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, पोषण अभियान, पीएम पोषण योजना यांसारख्या शासकीय योजनांची माहिती देत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे बालिकेच्या पाठीशी उभे आहे, हा विश्वास मुलींमध्ये निर्माण करण्याचा हेतू असून या जनजागृती कार्यक्रमामुळे बालिकांच्या जीवनात आत्मभानाचा प्रकाश आणि भविष्याकडे पाहण्याचा आत्मविश्वास दिसून आल्याचे आणि हाच राष्ट्रीय बालिका दिनाचा खरा अर्थ असल्याचे मत मुख्याद्यापिका तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुजाता जुगदार यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा च्या कर्मचाऱ्यांनी व प्रशालेच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!