सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर शहरातील मुरारजी पेठ परिसरात पार्किंग जागेत विनापरवाना व नियमबाह्य बांधकाम केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, याबाबत सामाजिक कार्यकर्ते गौतम आप्पाराव गवळी यांनी सोलापूर महानगरपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी करत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एक दिवसीय धरणे आंदोलन केले.

गंगा निवास, मुरारजी पेठ, अशोक गेस्ट समोर, पोलीस लाईन परिसरात ज्ञानेश्वर सपाटे व माजी महापौर मनोहर सपाटे यांनी इमारतीच्या पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेत कोणतीही अधिकृत बांधकाम परवानगी न घेता बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सदर बांधकामासाठी सोलापूर महानगरपालिकेची तसेच नगररचना व बांधकाम विभागाची कोणतीही मंजुरी घेण्यात आलेली नसून, नगररचना नियमांचे उल्लंघन करून पार्किंग जागेचे स्वरूप बदलण्यात आले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण झाला असून सार्वजनिक सोयी सुविधांवरही अतिक्रमण झाले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही बाब महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व नगररचना कायद्याचे स्पष्ट उल्लंघन करणारी असून, याकडे महानगर पालिकेने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी गवळी यांनी केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत संबंधित ठिकाणी तात्काळ प्रत्यक्ष पाहणी (इन्स्पेक्शन) करण्याची, दोषी आढळल्यास संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देण्याची, काम बंद आदेश (स्टॉप वर्क) लागू करण्याची तसेच नियमबाह्य बांधकाम असल्यास पाडकाम व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ही तक्रार कोणत्याही वैयक्तिक वादातून नसून, कायदा, सार्वजनिक हित व शहर नियोजनाच्या दृष्टीने करण्यात आल्याचेही गवळी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, शहरात वाढत चाललेल्या बेकायदेशीर बांधकामांवर महानगरपालिका प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
