सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका २०२६ च्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला भरघोस यश मिळवत एकहाती सत्ता स्थापन झाली आहे. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा तसेच अखंड मराठा समाजाच्या वतीने राज्य समन्वयक रवी मोहिते यांनी भाजपचे अभिनंदन केले.

मराठा समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी झालेले अनेक समाजबांधव भाजपच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरले होते. या समाजबांधवांनी महायुती सरकार दरबारी समाजाच्या काही प्रमुख मागण्या मांडून त्या मान्य करून घेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशा प्रामाणिक व पक्षाशी एकनिष्ठ कार्यकर्त्यांना मराठा समाजासह इतर बहुसंख्य समाज घटकांचा मोठा पाठिंबा मिळून ते भरघोस मतांनी विजयी झाले आहेत.

सोलापूर महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाले असून, या पदावर भाजपने आपल्या पक्षाशी दीर्घकाळ एकनिष्ठ राहिलेल्या, प्रामाणिक आणि कार्यक्षम कार्यकर्त्यालाच संधी द्यावी, अशी अपेक्षा मराठा समाजाने व्यक्त केली आहे. सर्वसाधारण जागेवर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार देऊन पक्षाने न्याय द्यावा, अशी ठाम भूमिका समाजाने मांडली असल्याची माहिती अखंड मराठा समाजाचे राज्य समन्वयक रवी मोहिते यांनी दिली. याबाबतचे लेखी निवेदन भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर यांना देण्यात आले.

दरम्यान, सत्तेवर आल्यानंतर सोलापूर शहरातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, उड्डाणपूल, आयटी पार्कसारखे विकासाचे रखडलेले प्रश्न मार्गी लावून सोलापूर शहर सुजलाम-सुफलाम करावे, अशा शुभेच्छाही मराठा समाजाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. भाजपच्या या यशामुळे सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही समाजातील विविध घटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
