जुनी मिल भूखंड प्रकरणात खंडणीच्या आरोपांचे खंडन; कुमार करजगीवर तातडीच्या कारवाईची मागणी

3 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापुरातील बहुचर्चित जुनी मिल भूखंड घोटाळ्याप्रकरणी प्रमुख आरोपी कुमार शंकर करजगी याने केलेले खंडणीचे आरोप पूर्णतः खोटे व दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट खंडन जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समितीचे सचिव डॉ. संदीप आडके यांनी केले आहे. करजगी याने २३ जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, डॉ. आडके यांनी तक्रार मागे घेण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. हा आरोप निराधार असून पोलिस आयुक्तांनीही याबाबत तथ्य तपासून बातमीचे खंडन केल्याचे डॉ. आडके यांनी सांगितले.

डॉ. संदीप आडके यांच्यासह जुनी मिल ट्रस्टचे अनेक ट्रस्टी व सभासदांनी २७ जानेवारी रोजी सोलापूरचे पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन करजगी याच्याविरोधात तक्रार दाखल केली. बदनामीकारक खोट्या बातम्या प्रसारित केल्याबद्दल आयटी कायद्यान्वये संबंधित माध्यमांवर कारवाई करावी, ५ जानेवारी २०२६ रोजी पोलिस आयुक्तालयातील सीसीटीव्ही फुटेज जतन करून उपलब्ध करून द्यावे, तसेच करजगी याचा जामीन रद्द होईपर्यंत स्थानबद्धतेची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

जुनी मिल भूखंड घोटाळ्यात कुमार करजगी व त्याचा सहकारी सुरेंद्र कर्णिक हे २०१७ पासून उच्च न्यायालयाच्या अटींवर जामिनावर बाहेर आहेत. मात्र, करजगीने वारंवार जामिनाच्या अटींचा भंग केल्याने ११ फेब्रुवारी २०२५ रोजी न्यायालयाने त्याला लेखी हमीपत्रावर सक्त ताकीद दिली होती. तरीही कोणतेही अधिकार नसताना संबंधित जागेवर सर्कस, फूड फेस्टिव्हल, प्रदर्शन, लग्न समारंभ तसेच होर्डिंग लावण्यासाठी जागा देणे, विक्री व्यवहार करणे असे बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

डॉ. आडके यांनी सांगितले की, २००६ साली धर्मादाय आयुक्तांनी कुमार करजगी व त्याच्या संचालक मंडळाला ट्रस्टमधून कायमस्वरूपी बरखास्त केले असून २००१ पासून विविध न्यायालयांनी या जागेच्या व्यवहारांवर बंदी घातलेली आहे. तरीही खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमिनीची विक्री करून हजारो कामगार व नागरिकांची फसवणूक करण्यात आली.

२९ डिसेंबर २०२५ रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालयात करजगीने न्यायाधीशांसमोरच डॉ. आडके यांना अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटनाही घडली होती, ज्यावेळी पोलिसांना पाचारण करावे लागले.

हा हजारो कोटींचा भूखंड घोटाळा ‘व्हाईट कॉलर ऑर्गनाइज्ड स्कॅन्डल’ असून यात विविध शासकीय यंत्रणा, व्यावसायिक व प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्याचा गंभीर आरोपही डॉ. आडके यांनी केला आहे. येत्या आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास हे प्रकरण राष्ट्रपती व सरन्यायाधीशांपर्यंत नेण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, या प्रकरणाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसून फसवणूक झालेल्या कामगार व नागरिकांनी तात्काळ पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!