सोलापूर : प्रतिनिधी
यातील हकिकत यातील आरोपी प्रल्हाद विठ्ठल मोरे (कनिष्ठ सहाय्यक वर्ग -१) व मारुती बापू ठोकळे (कनिष्ठ सहाय्यक व भांडारपाल वर्ग -३) उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पंढरपूर या कार्यालयात कार्यरत होते.
मूळ तक्रारदार उत्तमराव जोंधळे, उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, पंढरपूर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन, रजा रोखीकरणातील फरकाची रक्कम, वेतनातील फरकाची रक्कम तसेच सुधारित निवृत्तीवेतनाप्रमाणे वेतन विक्रीचा फरक अशी बिले मिळालेली नव्हती, म्हणून ती बिले मिळण्यासाठी तक्रारदार जोंधळे यांनी उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, पंढरपूर या कार्यालयात दि.११/०९/२००९ रोजी विनंती अर्ज दिला होता. सदर अर्जानुसार वेतननिश्चिती आदेश प्राप्त झाल्यानंतर देयके अदा केली जातील, असे त्यांना लेखी कळविण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी सदर कार्यालयातील प्रल्हाद मोरे, कनिष्ठ सहाय्यक यांची भेट घेऊन वरील नमूद बिले मंजुरीस पाठवण्यास सांगितले असता, त्यांनी सदर बिलाचे काम करण्यासाठी रक्कम रु. ५,०००/- च्या लाचेची मागणी केली. त्यानंतर दि. २०/११/२००९ रोजी तक्रारदार जोंधळे यांनी एमबी रजिस्टर व वाहनगणती मस्टर व रोजगार हमी योजना मस्टर तात्काळ जमा करावे व कार्यालयाकडून येणे- देणे नसल्याबाबतचा दाखला आणल्याशिवाय वेतन निश्चिती केली जाणार नाही, असे पत्राव्दारे कळविण्यात आले होते. त्यावेळी मारुती ठोकळे, भांडारपाल यांनी रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यासाठी जोंधळे यांच्याकडे रक्कम रु. २,५००/- ची मागणी केली.

सदर लाच मागणीसंदर्भात जोंधळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्याकडे आरोपी प्रल्हाद मोरे व आरोपी मारुती ठोकळे यांच्या विरोधात दि. १७/०८/२०१० रोजी तक्रार दिलेली होती. सदर लाच मागणीबाबतची पडताळणी पंचांसमक्ष करण्यात येऊन आरोपींनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पुढील सापळा रचण्यात आला, सदर सापळा कारवाईत आरोपी मारुती ठोकळे यांना स्वतःसाठी म्हणून लाच रक्कम रु. २,५००/- व आरोपी प्रल्हाद मोरे यांच्यासाठीची म्हणून लाच रक्कम रु. ५,०००/- असे एकूण रक्कम रु. ७,५००/- तक्रारदार जोंधळेकडून स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी अटक करून दोन्ही आरोपीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलमान्वये पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर दोन्ही आरोपींविरुद्ध पंढरपूर येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले होते.

सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले होते. सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदार व कागदपत्रांच्या आधारे दोन्ही आरोपी प्रल्हाद मोरे व मारुती ठोकळे यांनी लाचेची मागणी केल्यासंदर्भातील कोणताही ठोस व सबळ पुरावा आलेला नसून साक्षीदारांच्या जवाब अनेक महत्त्वपूर्ण विसंगती व त्रुटी असल्याचे, तसेच आरोपीस तक्रारदाराचे कोणतेही काम आरोपींकडे प्रलंबित नसताना केवळ कार्यालया मार्फत जोंधळे यांच्याविरुद्ध केले जाणाऱ्या कारवाईस बगल देणेसाठी तक्रारदाराने दोन्ही आरोपी प्रल्हाद मोरे व मारुती ठोकळे यांना खोटेपणाने गुंतविण्यात आल्याचे मे. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

सदर प्रकरणात दोन्ही आरोपी प्रल्हाद मोरे व मारुती ठोकळे यांच्यावतीने ॲड. निलेश जोशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून दोन्ही लोकसेवक आरोपींची लाचलुचपत प्रतिबंध कायद्याचे कलम ७, १२, १३(१)(ड), सह १३(२) मधून पंढरपूर येथील मे. श्री. एस. जी. नंदीमठ, विशेष न्यायाधीश, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, यांनी निर्दोष मुक्तता केलेली आहे.

तत्कालीन सक्षम प्राधिकारी श्री. वीरेंद्र सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर यांनी प्रस्तुत प्रकरणात मंजुरी देताना कार्यालयीन कागदपत्राची शहानिशा न करता सारासार विवेक बुद्धीचा वापर केला नाही, असे महत्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवलेले आहे.
सदर प्रकरणात दोन्ही आरोपींच्यावतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. शिल्पा कुलकर्णी, ॲड. प्रभाकर गायकवाड व ॲड. कुमार बाबर, पंढरपूर व ॲड. राणी गाजूल यांनी काम पाहिले.
