सोलापूर : प्रतिनिधी
गोवा राज्यात विक्रीस असलेले परंतु महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेले विदेशी मद्य महाराष्ट्रातील परवानाधारक दारूच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून बनावट मद्य तयार करून विक्री केल्याच्या गंभीर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सोलापूर येथील आरोपीस न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीचे नाव सुमित राजेंद्र गडगी (रा. सोलापूर) असे आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागास २७ जानेवारी २०२६ रोजी खात्रीलायक बातमी मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी पंचांसह सोलापूर शहरातील रंगराज नगर, आर्यन इंग्लिश मिडियम स्कूलसमोर असलेल्या गडगी फार्म हाऊसवर छापा टाकला. छाप्यादरम्यान घराच्या पोर्चमध्ये एक इसम संशयास्पद अवस्थेत आढळून आला. तपासणी दरम्यान फार्म हाऊसमधील दोन खोल्यांमध्ये विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या भरलेल्या व रिकाम्या बाटल्या, कागदी बॉक्समध्ये साठवून ठेवल्याचे निदर्शनास आले.

तपासात मास्टर डिलक्स, किंगफिशर, रॉयल स्टॅग, ओल्ड मंक, ब्लेंडर्स प्राईड, मॅकडोवेल्स, इम्पेरियल ब्लू, ट्युबर्ग बिअर आदी ब्रँडचा सुमारे ८ लाख ४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. सदर दारू गोव्यात विक्रीस असलेली असल्याचे आरोपीने कबूल केले. यासह बनावट विदेशी मद्य तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रिकाम्या बाटल्याही जप्त करण्यात आल्या.
आरोपी सुमित गडगी यास अटक करून त्याच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासात आरोपीने सदर मद्य दुसऱ्या व्यक्तीकडून आणल्याचे तसेच अक्कलकोट रोड परिसरातील एका इसमास विक्री केल्याचे सांगितले.

दरम्यान, आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर यांच्या मार्फत जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. सर्व मुद्देमाल जप्त झाला असून तपास पूर्ण झाल्याचा युक्तिवाद ग्राह्य धरत सोलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीस जामीन मंजूर केला. या प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर, अॅड. राम शिंदे, अॅड. संतोष आवळे, अॅड. फैयाज शेख व अॅड. सुमित लवटे यांनी काम पाहिले.
