सोनी नगर–जानकर नगर ५४ मीटर बायपास रस्त्यावर अपघात; वाहतूक व्यवस्था व अतिक्रमण हटविण्याची नागरिकांची मागणी

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

सोनी नगर पासून जाणाऱ्या ५४ मीटर बायपास रस्त्यावर जानकर नगर परिसरात आज एक गंभीर अपघात घडला. अनोळखी वाहनाने एका वृद्ध महिलेला जोरदार धडक दिल्याने त्या रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत कोसळल्या. अपघातानंतर काही काळ त्या महिलेला तात्काळ वैद्यकीय मदत मिळू न शकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन महिलेला रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

या अपघातामुळे सोनी नगर ते जानकर नगर दरम्यानच्या बायपास रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हा रस्ता दिवसेंदिवस अधिक वर्दळीचा होत असून, जड वाहनांसह चारचाकी व दुचाकी वाहनांची सतत ये-जा सुरू असते. मात्र, वाहतूक शाखेचे कर्मचारी या ठिकाणी नियमितपणे नेमले जात नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

जानकर नगरमधील नागरिक व रहिवाशांनी तीव्र भावना व्यक्त करत सांगितले की, या रस्त्यावर अनेक ठिकाणी चारचाकी वाहने अनधिकृतरीत्या पार्क केली जातात. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन अपघातांचा धोका अधिक वाढतो. याबाबत वाहतूक पोलिसांनी तात्काळ कारवाई करून अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी ठाम मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

याचबरोबर, सोनी नगर ते जानकर नगर हा संपूर्ण रस्ता अनधिकृत अतिक्रमणाने वेढलेला असल्याचा गंभीर मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला हातगाड्या, टपऱ्या, दुकाने व काही ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवण्यात आल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रकाशाची व्यवस्था अपुरी असल्याने अपघातांचा धोका अधिकच वाढतो.

“आज अपघात एका वृद्ध महिलेसोबत झाला, उद्या कोणा सोबत होईल याची खात्री नाही,” अशी भावना व्यक्त करत सोनी नगर व जानकर नगरमधील रहिवाशांनी प्रशासनाला जागे होण्याचे आवाहन केले आहे. या मार्गावर तात्काळ वाहतूक शाखेचे कर्मचारी नेमावेत, वेगमर्यादा फलक, सिग्नल व रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी ठोस मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

जर प्रशासनाने वेळेत योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात मोठ्या अपघातांची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. आता या घटनेनंतर तरी संबंधित यंत्रणांनी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!