सोलापूर : प्रतिनिधी
शहरातील महापौरपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून न्याय्य प्रतिनिधित्वाची जोरदार मागणी पुढे आली आहे. १९९३ मध्ये सपाटे यांच्या कार्यकाळानंतर गेल्या तब्बल तीन दशकांपासून मराठा समाजाला महापौरपदाची एकही संधी मिळालेली नाही, ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि अन्यायकारक असल्याची भावना समाज बांधवांकडून व्यक्त होत आहे.

१९९३ नंतरच्या कालावधीत विविध समाजघटकांना महापौरपदाची संधी देण्यात आली. या काळात कै. महेश कोठे, सुभाष पाटणकर, ख्वाजादाऊद नालबंद, शेवंताबाई पवार, जनार्दन कारमपुरी, संजय हेमगड्डी, नलिनी चंदेले, विठ्ठल जाधव, अरुणा वाकसे, आरिफ शेख, अलका राठोड, सुशीला आबुटे, शोभा बनशेट्टी व श्रीकांचना यन्नम यांना महापौरपदाची संधी देण्यात आली आहे. समाज घटकनिहाय पाहता पद्मसाली समाजाला तीन वेळा, मुस्लिम, लिंगायत व लमाण समाजाला प्रत्येकी दोन वेळा, तर ब्राह्मण, कैकाडी व धनगर समाजाला एकेक वेळा महापौरपद मिळाले आहे.

मात्र संख्येने मोठा, सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि लोकशाही मूल्यांवर ठाम विश्वास ठेवणारा मराठा समाज गेल्या ३० वर्षांपासून या न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे यंदा ही प्रलंबित असलेली मागणी पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक व मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, मराठा समाजाचे अनुभवी नेतृत्व अनंत जाधव यांना महापौरपद देण्यात यावे, अशी ठाम मागणी मराठा समाजाने केली आहे. त्यांच्या निवडीचे जिल्ह्यातील मराठा बांधव स्वागत करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने या रास्त मागणीचा गांभीर्याने विचार करून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा मराठा समाजाकडून व्यक्त केली जात आहे.
