सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करत शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत भाजपाने प्रथमच १०२ जागांवर उमेदवार उभे करत मोठ्या ताकदीने निवडणूक लढवली होती. सोलापूरकर मतदारांनी भाजपावर भरभरून विश्वास टाकत पक्षाच्या पारड्यात कौल दिला असून, तब्बल ८७ नगरसेवक विजयी झाले आहेत.
या दणदणीत यशानंतर भाजपाच्या गटनेतेपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले होते. अनेक इच्छुकांनी आपापल्या परीने प्रयत्न केले असले, तरी अखेर पक्षश्रेष्ठींनी सर्वानुमते नरेंद्र काळे यांची भाजपाच्या गटनेतेपदी निवड जाहीर केली.
ही निवड करताना नरेंद्र काळे यांनी यापूर्वी विरोधी पक्षनेते म्हणून केलेले प्रभावी काम, शहराध्यक्ष असताना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी घेतलेले परिश्रम, तसेच सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करण्याची त्यांची नेतृत्वक्षमता या सर्व बाबींचा सखोल विचार करण्यात आला. पालकमंत्री जयकुमार गोरे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, शहरातील तिन्ही आमदार तसेच नव्याने निवडून आलेले सर्व नगरसेवक यांच्या एकमताने ही निवड करण्यात आली.
नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेत भाजपाचे मजबूत व स्थिर प्रशासन देण्याचा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला असून, शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
