केतनभाई शहा यांच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी नागरिकांचे निवेदन, “सोलापूरकर एकवटले”..

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी सक्षम, अभ्यासू व विश्वासार्ह नेतृत्वाला संधी मिळावी, या उद्देशाने केतन महेंद्र शहा यांची सोलापूर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी ठाम मागणी शहरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तसेच सोलापूरचे नूतन जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.

शनिवार, दि. 31 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता आसरा चौक येथील बालाजी सरोवर परिसरात मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येऊन हे निवेदन देण्यात आले. शहराच्या विकासासाठी दूरदृष्टी असलेले, सुशासनाला प्राधान्य देणारे आणि जनतेच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण व प्रभावी भूमिका मांडणारे नेतृत्व महानगर पालिकेत असणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

केतन शहा यांनी आजपर्यंत सामाजिक व जनहिताच्या विविध विषयांवर सातत्याने कार्य केले असून ते सध्या सुमारे 29 संस्थांमध्ये ऑनररी स्वरूपात सेवा देत आहेत. त्यामुळे शहराच्या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरेल, असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.

सोलापूरसाठी विमानसेवा, आयटी पार्क, गोसंवर्धन, ग्रामीण पाणीपुरवठा, बहुजन समाजाचे शिक्षण, नवीन उद्योग व रोजगार निर्मिती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर प्रभावीपणे काम करणारे नेतृत्व मिळावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. “विकासासाठी, विश्वासासाठी आणि सशक्त सोलापूरसाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे; गरज पडल्यास संघर्षही केला पाहिजे,” असा संदेश उपस्थितांनी दिला. या वेळी 94 वर्षीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास शहा (प्राणी मित्र) हे स्वतः उपस्थित राहून त्यांनी विविध संस्थांच्या शिफारशींसह स्वतंत्र पत्र देत या मागणीला जाहीर पाठिंबा दिला.

या प्रसंगी जैन सोशल ग्रुप सेंट्रलचे संजय शहा, सौ. संतोष बंब, सुदर्शन गांधी, सौ. कामिनी गांधी, संजय पटवा; पार्क रोड शोरूम्स असोसिएशनचे सुरेंद्र जोशी, उमेश एनापूर, शाम क्षीरसागर; महाराष्ट्र चेंबरचे संजीव पाटील, राजीव देसाई; दिगंबर जैन समाजाचे सुनील गांधी, राजकुमार कोठडिया; गोशाळा प्रतिनिधी, सोलापूर विकास मंच, इलेक्ट्रॉनिक्स डीलर असोसिएशन, सर्वोदय सोसायटी यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या कार्यक्रमास सुमारे 100 हून अधिक सुशिक्षित पुरुष व महिलांची उपस्थिती लाभली. सोलापूरला सक्षम प्रतिनिधित्व मिळावे आणि विकासकामांना बळ मिळावे, या सामूहिक भावनेतून नागरिकांनी ही एकजूट दाखवून दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!