सोलापूर : प्रतिनिधी
पोलीस दलातील कर्तव्यदक्ष हवालदार भागवत शिंदे यांची 7 ते 8 फेब्रुवारी 2026 दरम्यान तेलंगणा राज्यातील करीमनगर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे ते महाराष्ट्र पोलीस दलासह पर्यायाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

करीमनगर (तेलंगणा) येथे होणाऱ्या या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांतील पोलीस दलातील उत्कृष्ट खेळाडू सहभागी होणार असून, त्या पार्श्वभूमीवर भागवत शिंदे यांची महाराष्ट्र संघात निवड होणे ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत असलेले भागवत शिंदे हे आपल्या कर्तव्याबरोबरच क्रीडा क्षेत्रात सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि जिद्दीने कामगिरी करत आले आहेत. त्यांच्या या मेहनतीचे फळ म्हणजेच ही राष्ट्रीय स्तरावरील निवड असल्याचे बोलले जात आहे.

या निवडीमुळे महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, पोलीस प्रशासन, सहकारी अधिकारी, क्रीडाप्रेमी तसेच नागरिकां कडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्यांच्या पुढील यशासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून काम करत असतानाच राष्ट्रीय पातळीवर राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हे तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. भागवत शिंदे यांच्या या यशामुळे सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याचा गौरव वाढल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
