सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर येथील रहिवासी अमृता संदीप शिंदे वय-३५वर्षे, रा. गरिबी हटाव झोपडपट्टी, सोलापूर यांना जातीवाचक शिवीगाळ करून खून केल्याप्रकणीच्या गुन्ह्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री जयदीप मोहिते सो यांनी आरोपीचा जामीन मंजूर केला.

यात थोडक्यात हकीकत अशी की, दि.१७/१०/२०२५ रोजी रात्री ११.०० वाजणेच्या सुमारास फिर्यादी प्रतिमा शंके या घरासमोर रस्त्यावर उभ्या असताना त्यांना मोठमोठ्याने भांडण्याचा आवाज येत होता. गरिबी हटाव झोपडपट्टी नं. १ संघर्ष तरुण मंडळाच्या पुढे आरोपी १) आकाश तुळजाराम बलरामवाले २) नवल करे 3) अमृता संदीप शिंदे 4) लक्ष्मी आकाश बलरामवाले हे फिर्यादीचे पती यतिराज शंके यास हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण करत होते.

त्यावेळी आकाश बलरामवाले हा पळून जावून त्याच्या घरातील कुऱ्हाड घेवून आला व यतिराज शंके याचे डोक्यात पाठीमागून कुऱ्हाडीने वार केला, त्यामुळे फिर्यादी यांचे पती यांचा मृत्यू झाला अशा आशयाची फिर्याद मयत यतिराज शंके यांच्या पत्नीने विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं.५००/२०२५ अन्वये दाखल केली होती. सदर गुन्ह्यात पोलीसांनी दि.२८/१२/२०२५ रोजी अमृता संदीप शिंदे यांना अटक झाली होती. आरोपीने सोलापूर येथील सत्र न्यायालयात जामीन मिळणे साठी अर्ज दाखल केला होता त्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री जयदीप मोहिते सो यांच्या न्यायालयासमोर झाली. सदरकामी फिर्यादीच्या वकिलांनी प्रतिज्ञापत्र दाखल करुन जामीन अर्जास तीव्र विरोध केला होता.

तथापि, आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून में न्यायालयाने आरोपीस जामीनावर सोडण्याचा आदेश पारित केला. सदरकामी आरोपीतर्फे अॅड. गुरुदत्त बोरगांवकर, अॅड. विश्वास शिंदे अॅड. शिवानी करावा अॅड.निकिता कुलकर्णी यांनी तर सरकारतर्फे अॅड. दत्ता पवार यांनी काम पाहिले.
