महापालिका शाळांचा सर्वांगीण विकास फक्त सांगून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून करून दाखवणार : चाकोते

1 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

माता रमाई जयंतीचे औचित्य साधून अपरिचित सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नगरसेविका रंजीता चाकोते यांच्या हस्ते मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक 29, भवानीपेठ, सोलापूर येथील इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची पुस्तके वाटप करण्यात आली. या उपक्रमामुळे शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला असून त्यांच्या अभ्यासाला निश्चितच चालना मिळणार आहे. समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

याप्रसंगी बोलताना नगरसेविका रंजीता चाकोते म्हणाल्या की, “महापालिका शाळांचा सर्वांगीण विकास फक्त सांगून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून करून दाखवणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनेक गरजा असतात. त्या गरजा थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाबरोबरच खेळालाही तितकेच महत्त्व द्यावे, जेणेकरून शरीर तंदुरुस्त राहील आणि सर्वांगीण विकास साधता येईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी अपरिचित सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मयूर गवते यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. यानंतर नगरसेविका रंजीता चाकोते यांनी अपरिचित सामाजिक संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना, “समाजातील प्रत्येक गरजूंपर्यंत पोहोचण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अपरिचित सामाजिक संस्था करत असून हे कार्य अत्यंत प्रेरणादायी व महान आहे,” असे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अपरिचित सामाजिक संस्थेचे तसेच शाळेतील शिक्षकवर्गाचे उपस्थितांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!