सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात, २ दरोड्यांसह ६ घरफोड्यांतील आरोपी अटकेत

1 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत मोठी कारवाई करत दरोडे व घरफोडी प्रकरणातील सराईत आणि फरारी आरोपीला अटक केली आहे. घुल्या उर्फ गुलाब उर्फ प्रितिज्ञान झिगझिंग पवार (रा. कलकर्जाळ, ता. अक्कलकोट) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्यावर २ दरोडे आणि ६ घरफोड्यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील फरारी व पाहिजे आरोपींवर कारवाई करण्यासाठी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथके सक्रिय करण्यात आली होती.

दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर व त्यांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संबंधित आरोपी अक्कलकोट परिसरातील कोन्हाळी ते अक्कलकोट मार्गावरील पुलाखाली थांबलेला आहे. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचत आरोपीला शिताफीने पकडले. अटकेवेळी त्याच्याकडे धारदार शस्त्र आढळून आले असून विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरोधात आर्म अॅक्टनुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासात आरोपीविरुद्ध अक्कलकोट, मोहोळ, मंद्रुप आणि मंगळवेढा पोलीस ठाण्यांत दरोडा, घरफोडी, चोरी व इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे स्पष्ट झाले. या अटकेमुळे अनेक प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!