सोलापूर : प्रतिनिधी
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय उच्चस्तरीय समितीवर खासदार ज्योती वाघमारे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या या समितीत देशभरातून निवडक १२५ मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे. अशा प्रतिष्ठित समितीत सोलापूरच्या नेतृत्वाला स्थान मिळणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब ठरली आहे.

फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा वारसा राष्ट्रीय पातळीवर अधिक व्यापक आणि प्रभावीपणे पोहोचविण्यास या नियुक्तीमुळे निश्चितच बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल खासदार ज्योती वाघमारे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
