सोलापूर : प्रतिनिधी
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोलापूर जिल्ह्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून, सोलापूर लोकसभा प्रमुखपदी संजय पौळ यांची निवड करण्यात आली आहे. ही घोषणा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र सामना मधून केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाची अपेक्षित कामगिरी न झाल्याने आणि गटबाजी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनात्मक बदलाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत यापूर्वीच मिळाले होते. या अनुषंगाने जिल्हा संपर्क प्रमुखपदी सुषमा अंधारे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती.
अशा परिस्थितीत उत्तर सोलापूर तालुक्याचे विद्यमान तालुका प्रमुख संजय पौळ यांची सोलापूर लोकसभा प्रमुखपदी झालेली निवड महत्त्वाची मानली जात आहे. गुळवंची गावातून बाल शिवसैनिक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज या महत्त्वाच्या पदापर्यंत पोहोचला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी पक्षाशी अखंड निष्ठा ठेवत सातत्याने काम केले.
दरम्यान, अनेक वेळा वरिष्ठ पदांपासून दूर राहावे लागूनही त्यांनी पक्षाशी प्रामाणिक राहण्याची भूमिका कायम ठेवली. त्यांच्या या निवडीमुळे निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, सर्वपक्षीय राजकीय वर्तुळातूनही त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे.
संजय पौळ यांच्या नियुक्तीमुळे सोलापूर जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
