मयताची ओळख शाबीत करने महत्वाचे : सोलापूर जिल्हा न्यायालय, पती व सासू निर्दोष

सोलापूर : प्रतिनिधी
सुरेखा मलकारी निंबाळ वय 30 रा मिरजगी, ता अक्कलकोट हिचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती मलकारी लक्ष्मण निंबाळ वय 35, सासू सरुबाई लक्ष्मण निंबाळ वय 62 रा:- मिरजगी, ता अक्कलकोट, जि सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे यांचे समोर होऊन त्यांनी गुन्हा शाबीत न झाल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, दि 16/10/2018 रोजी सुरेखा लोंढे यांच्या उसाच्या शेतामध्ये अनोळखी स्त्री जातीचे प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आले, त्यावरून मिरजगी येथील पोलीस पाटलाने फिर्याद दिली होती. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करीत असताना सुरेखा हिने तिचे पती व सासू यांच्याविरुद्ध ते तिस मारहाण व शिवीगाळ करीत असले बाबत तीने 8/10/2018 रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, त्यामुळे आरोपी हे तिचे वर चिडून होते व दि:-15/10/2018 रोजी आरोपींनी तिस जीवे ठार मारून तिस पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असे पोलीस तपासात निष्पन्न झाले, त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले होते.
सदर खटल्यात सरकारतर्फे एकंदर सात साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आरोपीचे वकील ॲड मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात, मयताचे व मयताच्या मुलाचे डीएनए सॅम्पल घेतले होते परंतु डीएनए जुळत असल्याबाबतचे ठोस असे मत आले नसल्याने सदरचे प्रेत हे सुरेखाचेच असल्याबाबत संशय निर्माण होत असल्याचा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ॲड.मिलिंद थोबडे,ॲड दत्ता गुंड, ॲड.निशांत लोंढे तर सरकारतर्फे ॲड दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले.