बोगस मतदान प्रकरणी तक्रार, अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी
सोलापूर : प्रतिनिधी
बार्शी शहरातील गोकुळ किल्ला, मार्केट यार्ड रोड येथील रहिवासी गणेश रामचंद्र जाधव यांनी त्यांच्या नावावर बोगस मतदान झाल्याचे समजल्यावर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, बार्शी विधानसभा निवडणूक अधिकारी, तहसीलदार बार्शी, आणि पोलिस निरीक्षक बार्शी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी गणेश रामचंद्र जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे नाव बुथ क्रमांक 101 मध्ये अनुक्रमांक 1070 वर मतदान यादीत आहे. त्यांनी मतदान करण्यासाठी संबंधित बूथवर गेल्यानंतर तेथील निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांना माहिती दिली की त्यांच्या नावावर आधीच मतदान झाले आहे. यावर जाधव यांनी त्यांच्या हाताला शाई नसल्याचे दाखवले तसेच मतदान आणि आधार कार्डही सादर केले. त्यांनी कर्मचाऱ्यांकडे मतदार यादीत त्यांच्या नावाचे छायाचित्र तपासले असता, ते छायाचित्र जाधव यांचेच होते.
तथापि, कर्मचाऱ्यांनी आधार कार्ड क्रमांकाची तपासणी केल्यानंतर हे स्पष्ट केले की, आधीच मतदान केलेल्या व्यक्तीचा आधार क्रमांक वेगळा आहे. त्यावर जाधव यांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याची मागणी केली, मात्र त्यांना मतदान नाकारण्यात आले. त्यामुळे त्यांनी या घटनेबाबत तीव्र आक्षेप नोंदवित संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.
गणेश जाधव यांच्या तक्रारीनुसार, निवडणूक प्रक्रियेत घडलेली ही मोठी चूक आहे. बोगस मतदान होत असून त्यास आळा बसावा, यासाठी यंत्रणेची योग्य तपासणी होणे आवश्यक आहे. तसेच, बोगस मतदान करणे आणि ते घेणे हे गंभीर गुन्हे असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी गणेश जाधव यांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना मेलद्वारे आपली तक्रार सादर केली असून, त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी दिली जावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.