ॲड. अथर्व अंदोरे यांचा युक्तिवाद, खुनी हल्ल्या प्रकरणी जामीन मंजूर

सोलापूर : प्रतिनिधी
चौघांनी मिळून संगनमताने पोते फाडायच्या चाकूने प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याप्रकरणातील चार आरोपींपैकी दर्शन मनोज सराफ या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. जे. कटारिया यांनी जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की, घरासमोर दारू पिण्यास मज्जाव केल्याचा राग मनात धरून २३ नोहेंबर २०२४ रोजी पहाटे ३. ४५ वाजता इम्रान शब्बीर इनामदार यास आरोपी दर्शन सराफ सह चौघांनी मार्केट यार्ड सोलापूर येथे गाठून त्याच्यावर पोते फाडायच्या चाकूने तसेच लाथा बुक्यांनी प्राणघातक हल्ला केला. त्या हल्ल्यात इम्रान हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्यास सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल करण्यात आले होते. या बाबत इम्रानची आई रुखसाना इनामदार यांनी जेल रोड पोलीस ठाणे सोलापूर येथे फिर्याद दिली होती. गुन्ह्याचा तपास पो. उप. निरीक्षक अमोल डेरे यांनी केला.
वैद्यकीय प्रमाणपत्र गुन्ह्याच्या घटनेशी सुसंगत नसून आरोपी दर्शन याच्याविरुद्ध लावण्यात आलेली कलमे कायद्याने लागू होत नसल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील ॲड. अथर्व अंदोरे यांनी केला. तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपी दर्शन सराफचा जामीन मंजूर केला.
या खटल्यात आरोपी तर्फे ॲड.अथर्व अंदोरे, ॲड.आल्हाद अंदोरे, ॲड.सुयश पुळूजकर यांनी काम पाहिले. तर सरकार तर्फे ॲड. अल्पना कुलकर्णी यांनी काम पाहिले.