जड वाहतुकीसाठी रिंग रोड, ४० हजार घरकुले अन् समतोल धान्य वितरणाची आमदार देवेंद्र कोठे यांची विधानसभेत मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
जड वाहतुकीमुळे दर आठवड्याला होणारे मृत्यू थांबवण्यासाठी रिंग रोड, प्रधानमंत्री आवास योजनेतून भटक्या विमुक्त जमातींसाठी ४० हजार घरकुले आणि अन्न योजनेतील धान्यापासून वंचित असलेल्या सर्व एक लाख सोलापूरकरांना समान पद्धतीने धान्य वितरण व्हावे, तसेच सोलापूरच्या विमानतळाला ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचे नाव द्यावे, महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनमध्ये सोलापूरचा प्राधान्याने समावेश करावा, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन धोरणामध्ये धार्मिक पर्यटनाच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याचा समावेश व्हावा, सोलापूर जिल्ह्याला उमेद भवन मिळावे अशा मागण्या आमदार देवेंद्र कोठे यांनी मंगळवारी रात्री उशिरा विधानसभेत केल्या. अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी रात्री तब्बल ११.३० वाजेपर्यंत सभागृहात थांबून आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांच्या विकासकामांकडे शासनाचे लक्ष वेधत कार्यतत्परता दाखवली.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, सोलापूर शहर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या सीमेवर असल्यामुळे या तीनही राज्यातील जड वाहतूक सोलापूर शहरातून जाते. परिणामी, जड वाहतुकीमुळे दर आठवड्याला २ जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून जड वाहतूक शहराबाहेरून नेण्यासाठी केगाव, कासेगाव, दोड्डी, कुंभारी, हत्तुर असा रिंग रोड होणे गरजेचे आहे. सुरत – चेन्नई ग्रीनफिल्डमध्ये या रस्त्याचा समावेश झालेला आहे. परंतु या कामाची अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे याचा प्राधान्याने विचार करून सोलापूर शहरातील जड वाहतूक कायमस्वरूपी बंद होण्यासाठी आणि गोरगरिबांचे मृत्यू थांबवण्यासाठी शासनाने अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा २०२५- २७ मध्ये रिंग रोडची तरतूद करावी.
वस्त्रोद्योग आणि आयटी क्षेत्रासाठी सोलापूरमध्ये चांगली क्षमता आहे. त्यामुळे या क्षेत्रातील अधिकाधिक कंपन्या सोलापुरात याव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी केली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उद्योगासाठी पोषक वातावरण, रेल्वे मार्ग, महामार्ग, कुशल कामगार वर्ग आहे. महाराष्ट्र शासनातर्फे स्थापन होऊ घातलेल्या टेक्निकल टेक्स्टाईल मिशनमध्ये सोलापूरचा समावेश प्राधान्याने करावा, असेही आमदार कोठे म्हणाले.
सोलापूर विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू व्हावी याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घातले आहे. त्यामुळे अल्पावधीतच सोलापूरची विमानसेवा सुरू होईल. सोलापुरातून प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर विमानतळाला ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे नाव देण्यात यावे, अशी आग्रहाची मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी केली. सोलापुरातील गोरगरिबांसाठी अत्यावश्यक बाब असलेल्या घरकुलांचा प्रश्नही आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत मांडला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात भटक्या विमुक्त जमातींसाठी सेटलमेंट परिसरात प्रस्तावित असलेल्या ४० हजार घरकुलांच्या योजनेला शासनाने प्राधान्याने मान्यता द्यावी, याकडे आमदार देवेंद्र कोठे यांनी शासनाचे लक्ष वेधले.
राज्य शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत निकषात बसणाऱ्या सर्वांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळणे अपेक्षित असतानाही सोलापुरातील एक लाख नागरिकांना धान्य मिळत नाही. त्यामुळे शासनाने समतोलपणे धान्य वितरण करावे, अशी भूमिका आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतली. प्रत्येक जिल्ह्याला एक उमेद भवन उभारण्याकरिता १० जिल्ह्यांची निवड शासनाने केली आहे. त्याकरिता १५० कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. यात सोलापूर शहराचा विचार प्राधान्याने व्हावा, असे आमदार कोठे याप्रसंगी म्हणाले.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन धोरणामुळे आगामी दोन वर्षात राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. सोलापूर शहर हे अक्कलकोट, पंढरपूर आणि तुळजापूर अशा देवस्थानांना जोडणारे शहर आहे. त्यामुळे सोलापूर शहरात धार्मिक पर्यटनाला मोठा वाव आहे. त्याकरिता महाराष्ट्र शासनाने पर्यटन धोरणामध्ये सोलापूर शहराचा विचार करावा, अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी सभागृहात केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक आणि विकासाची हमी
आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरच्या विकासकामांबाबत शासन दरबारी मांडलेल्या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देवेंद्र कोठे यांचे प्रत्यक्ष भेटीत कौतुक केले. सोलापूर शहराच्या संपूर्ण विकासासाठी लागेल ती सर्व मदत करण्याची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना दिली.