कर आणि दरवाढ नसलेला महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर, काटकसरीचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी केला सादर

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेचा सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प पालिकेच्या उपसमितीत मंजूर झाला असून यात कोणत्याही प्रकारची कर आणि दरवाढ नाही अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली. एकूण अर्थसंकल्प १२९३ कोटी ३० लाख १३ हजार ४०१ रूपयांचा आहे. यात महसूली जमा ७७३ कोटी १६ लाख तर अनुदानं ४२३ कोटी, कर्ज जमा ९७ कोटी रूपये आहे.
आज या अर्थसंकल्पातील तरतूदीविषयी आयुक्त ओंबासे यांनी माहिती दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे, मुख्यलेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर उपस्थित होते. महसूली उत्पन्न वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी नवनवीन उत्पन्न श्रोत शोधले जातील यासाठी नागरिकांनीही सूचना कराव्यात.
शहरात शाळांचा कायापालट करत पुढील शैक्षणिक वर्षात दोन सीबीएससी धर्तीवर शाळा सुरू होतील, पालिकेनं सातरस्ता येथे पेट्रोल पंप सुरू केला असून आणखी एक पंप हैदराबाद रस्त्यावर सुरू होईल. बीओटी तत्वावर शहरात १४ ठिकाणी व्यापार संकुलं उभारली जातील, परिवहन उपक्र माला अर्थसहाय्य देवू, अनेक छोटी मोठी कामं विविध उद्योजक कंपन्यांच्या सीआर फंडातून करू घेवू, उजनी सोलापूर दुसरी पाईपलाईन लवकरच कार्यान्वित होईल तर शहरातील दोन उड्डाणपूलासाठी भूसंपादनास पालिका निधी देईल. पीएमई बससेवा लवकरच सुरू होणार आहे. शहरातील पावसाळी ड्रेनेज सुधारणासाठी विशेष निधी तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सुविधा आणि उद्यानं यासाठीही प्रशासन प्रयत्नशील असल्याचं आयुक्तांनी सांगितलं.