सोलापूरराजकीयशेती

शेतीसाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब आवश्यक, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राज्याची सिंचन क्षमता पूर्वी ३.८६ लाख हेक्टर होती, आता ती ५५ लाख हेक्टरवर पोहोचली

सोलापूर : प्रतिनिधी (पंढरपूर)

पूर्वी शेतीसाठीच सिंचन व्यवस्था होती. परंतु औद्योगीकरण आणि शहरीकरणामुळे शेतीसाठी उपलब्ध पाणी कमी होत असल्याने, पारंपरिक सिंचन पद्धतीत बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा सिंचनासाठी शेतकऱ्यांनी वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

सांगोला महाविद्यालयात आयोजित २१ व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेत मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या परिषदेत आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, जलसंपदाचे सचिव डॉ. संजय बेलसरे आदींचा समावेश होता. या कार्यक्रमात विविध जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*दुष्काळमुक्त महाराष्ट्र*

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारचे धोरण आहे की राज्याला पूर्णपणे दुष्काळमुक्त करणे. पुराच्या अतिरिक्त पाणी वाया जाऊ नये म्हणून नदी जोड प्रकल्पांना चालना दिली जात आहे. “राज्याची सिंचन क्षमता पूर्वी ३.८६ लाख हेक्टर होती, आता ती ५५ लाख हेक्टरवर पोहोचली आहे. यात आणखी वाढ करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यावर जोर देऊन पाण्याचे व्यवस्थापन आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा प्रभावी वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

तसेच सोलर पॅनलच्या वापरामुळे धरणांवर वीज निर्मिती होईल आणि पाण्याचे बाष्पीभवन कमी होईल, असेही त्यांनी सांगितले. उजनी धरणात वाळू आणि गाळ जमा झाल्यामुळे पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाली आहे, याबाबत लवकरच उपाययोजना केली जाईल.

*प्रदूषण आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा*

मंत्री विखे पाटील यांनी नदीकाठच्या शहरांमधून प्रदूषणयुक्त पाण्याचा उत्सर्जनामुळे प्रभावित गावांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित पाणीसाठे करण्याबाबत विचार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. अनेक धरणात गाळ साठल्याने पाणी क्षमता कमी झालेली असून धरणातील गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. ही “सिंचन परिषदेच्या माध्यमातून सिंचन व्यवस्थापनाबाबत नागरिकांच्या सूचना आल्यास शासन त्यावर सकारात्मक विचार करून त्या अनुषंगाने धोरण तयार करेल, असे त्यांनी नमूद केले.

*सिंचन प्रकल्पांना गती*

जलसंपदाचे सचिव संजय बेलसरे यांनी सांगितले की, सांगोला तालुक्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सिंचन प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. “सिंचन व्यवस्थापनात आवश्यक बदल सुचवल्यास, त्या सूचना जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सोडविल्या जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

*स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन*

यावेळी भारतीय हवामान खात्याकडून स्थापित स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या यंत्राद्वारे हवेतील तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दिशा आणि पर्जन्यमानाची माहिती पुण्यातील हवामान विभागाला पाठविली जाते. ही माहिती व त्या अनुषंगाने आवश्यक सूचना स्थानिक शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे पाठवण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!