सोलापूरक्राईममहाराष्ट्रराजकीयसामाजिक

अशा भ्याड कृत्यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाईची मागणी शिवसैनिकांनी केली

सोलापूर : प्रतिनिधी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विरोधात आज सोलापुरात एक संतापजनक प्रकार घडला. ओंकार चव्हाण नावाच्या माथेफिरू व्यक्तीने, उद्धव ठाकरे यांचा सार्वजनिक ठिकाणी बेक़ायदेशीर कृत्य करित पोस्टर फाडला. या घटनेमुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.

संबंधित व्यक्तीने आरोप केला की, उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करत बिल मंजूरीला खासदारानी विरोध केला आणि त्यांनी हिंदुत्व सोडले. त्यामुळे आपण पक्षाचा राजीनामा देत आहोत असे असत्य व खोटे कारण पुढे केले. ही केवळ खाजगी वैयक्तिक मतांची आक्रमक पद्धतीने मांडणी नसून पक्षविरोधी व अनुशासनभंग करणारा प्रकार आहे. भाजपा व मिंधे गटाचा हा डाव शिवसैनिक हाणून पाडतील. या माथेफिरू वर तत्काळ कारवाई करून अटक करावी अन्यथा शिवसैनिक त्याला त्याची जागा दाखवतील असे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले.

पक्षविरोधी कारवाई केल्याने ओंकार चव्हाण याला पदावरून यापूर्वीच हटवले असून, त्याचे पक्षाशी कोणतेही संबंध नाहीत, असेही जाहीर केले आहे.

याचबरोबर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवसैनिकांच्या मते, “हा प्रकार केवळ उद्धव ठाकरे यांच्याच नव्हे, तर संपूर्ण शिवसेनेच्या विचारधारेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान आहे.”

पक्षशिस्त आणि नेतृत्वाचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा देत, शिवसेनेने पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे की, हिंदुत्व आमच्या हृदयात आहे, पण द्वेष आणि फोडाफोडीच्या राजकारणाला थारा नाही.

यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहरप्रमुख महेश धाराशिवकर, दत्ता वानकर, विधानसभाप्रमुख दत्ता माने, निवडणुक यंत्रणा प्रमुख शशिकांत बिराजदार, कामगार सेना सचिव अजय खांडेकर, उपशहरप्रमुख चंद्रकांत मानवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!