सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये एमएसएफडीए आणि आयआयटीद्वारा तीन दिवसीय कार्यशाळा

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट ॲकेडमी (एमएसएफडीए) आणि आय आय टी मुंबई यांच्या वतीने अभियांत्रिकी विद्याशाखेतील शिक्षकांसाठी ‘विकासाभिमुख क्षेत्राधारित अध्ययन’ या विषयावर केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय कार्यशाळा पार पडली.
27 ते 29 जानेवारी या कालावधीत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ही कार्यशाळा पार पडली. यात विविध महाविद्यालयासह सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकांसह 18 जणांनी सहभाग नोंदविला. पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. यास सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातून प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला होता.
एमएसएफडीएचे समन्वयक म्हणून कांचन भोसले, आणि आय आय टी उमाचे प्रतिनिधी विवेक शिंदे, स्वप्निल अंबुरे , गोपाल चव्हाण यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस सिंहगड इन्स्टिट्यूटच्या इंटर्नल क्वॉलिटी एश्यूरन्स सेलचे (आयक्यूएसी) सहकार्य लाभले. यावेळेस प्रशिक्षण देणाऱ्यांचा सत्कार सिंहगडचे उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे, डॉ. शेखर जगदे, आयक्यूए सेलचे प्रो. ए. के. शेख यांनी केला.
विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी-२०२०) सुसंगत अशा या कार्यशाळेत उपस्थित शिक्षकांना शहरी आणि ग्रामीण भागातील सामाजिक समस्या सोडविताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यावर मार्गदर्शन केले. आरोग्य, पाणीपुरवठा अशा शहरी नागरी सुविधांसह ग्रामीण भागातील शेती, आरोग्य, सेंद्रिय शेती, सौरऊर्जेचा वापर यावर मार्गदर्शन केले. शिक्षक पुढे हेच मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करणार आहेत. गावाची निवड करुन विद्यार्थ्यांच्या सहकार्याने गावात प्रयोग केला जाणार आहे.
वास्तविक जीवनातील सामुदायिक समस्यांसह अभ्यासक्रमाचे आंतर, बहु-अनुशासनात्मक दुवे कसे निर्माण करावे हे समजून घेण्यासाठी, विद्यार्थ्यांचे कम्युनिटी एंगेजमेंट फील्ड प्रोजेक्ट्स, जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप डिझाइन करण्यासाठी दिशानिर्देशासाठी या कार्यशाळेचा उपयोग झाला.