धक्कादायक.. रेल्वे मध्ये बसलेल्या चिमुकलीचा बाहेरून दगड मारल्याने मृत्यू

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरात एक खळबळजनक तितकीच हृदयाला पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. यात्रा करून सोलापुरात परत येत असताना चालू गाडीमध्ये दगड लागल्याने एका चिमुकलीच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
आज रविवार 20 एप्रिल रोजी यात्रा करून विजयापुर ते रायचूर पॅसेंजर मध्ये परत येत असताना होटगी गाव परिसरातील टिकेकरवाडी या ठिकाणी सदरील मन हेलवणारी घटना घडली. या रेल्वेत बसलेल्या चिमुकलीला सुमारे एक वाजण्याच्या दरम्यान चालत्या रेल्वे गाडीमध्ये बाहेरून कोणी अनोळखी व्यक्तीने दगड मारल्याने चार वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली. गंभीर अवस्थेमध्ये जखमी मुलीला एका खाजगी रुग्णालयामध्ये नेण्यात आले तेथून सोलापुरातील शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला.
शिवानी उर्फ आरोही अजित कारंगे, वय वर्ष चार असे मयत मुलीचे नाव आहे. ही बातमी मिळताच आई-वडिलावर दुखाचे डोंगर कोसळले असून परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. चालत्या रेल्वेला दगड मारणारा अज्ञात इसम कोण होता याची माहिती अद्याप समोर आली नाही.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेल्वे पोलीस दाखल झाली असून या घटनेचा तपास पोलीस करत आहे. एका कोवळ्या जीवाचा अज्ञात व्यक्तीने दगड मारल्याने मृत्यू झाल्याने समाजमन अस्वस्थ झाले असून त्या चिमुकली विषयी मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.