सोलापूरमहाराष्ट्रसामाजिक

“विद्यार्थ्यांनो सर्वोच्च स्थानी जाण्याचे ध्येय बाळगा”, स्वयंम शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशन तर्फे पत्रकारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप

सोलापूर : प्रतिनिधी

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारांचे विकासात मोठे योगदान आहे. समाजाचे प्रश्न मांडत असताना पत्रकारांचे त्यांच्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष होते. आपल्या आई वडिलांच्या त्यागाचा विचार करून विद्यार्थ्यांनी त्या त्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी जाण्याचे ध्येय बाळगले पाहिजे, असे आवाहन मान्यवर संपादकांनी केले.

विविध क्षेत्रात अल्पावधीत आपल्या कार्याचा ठसा उमटविलेल्या स्वयंम शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या वतीने श्रमिक पत्रकार संघाच्या सभासदांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम मान्यवर संपादकांच्या हस्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आज सकाळी पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, दैनिक सुराज्यचे संपादक राकेश टोळये, दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे, दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक नितीन फलटणकर, दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक प्रशांत माने, फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, दैनिक तरुण भारत संवादचे संपादक विजय देशपांडे, दैनिक जनसत्यचे संपादक सरदार अत्तार, दैनिक कटूसत्यचे संपादक पांडुरंग सुरवसे, दैनिक एकमतचे आवृत्ती प्रमुख संजय येऊलकर, इन न्यूज चैनल प्रमुख समाधान वाघमोडे, द न्यूज प्लस चैनलचे संचालक तात्या पवार, श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दशरथ वडतिले, सामाजिक कार्यकर्ते महादेव बगले आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी धर्मराज काडादी म्हणाले, नको त्या लोकांना प्रसिद्धी दिल्याने शहर विकासाऐवजी भकास झाले. प्रश्न जैसे थे राहिले. चांगल्या कामांची प्रसिद्धी आवश्यक आहे. आज शहराचा पाणी प्रश्न कायम आहे. सोलापूरचा पुण्यासारखा विकास व्हायला हवा होता. परंतु तो होताना दिसत नाही. पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे, तेव्हा सर्व संपादक, ज्येष्ठ पत्रकारांनी एकत्र येऊन काम केल्यास शहर जिल्ह्याचा विकास होईल. पत्रकारांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी लक्षात घेऊन श्रमिक पत्रकार संघाने स्तुत्य उपक्रम राबविल्याचेही काडादी म्हणाले.

राकेश टोळ्ये म्हणाले, भविष्यात काय व्हायचे ? हे विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच ठरविले पाहिजे. भविष्यात प्रत्येकजण डॉक्टर , इंजिनियर होण्याचे स्वप्न पाहतात मात्र देशाच्या सीमेचे संरक्षण करणारे जवान आणि सर्वांना धान्य पिकवणारा शेतकरीही तितकाच महत्त्वाचा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कमांड देण्याचे काम आता या नव्या कढीला करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा त्याग लक्षात ठेवून ध्येयप्राप्ती केली पाहिजे.

पत्रकारांच्या लेखणीच्या परिसस्पर्शातून सर्वजण मोठे होतात : फलटणकर 

पत्रकारांच्या लेखणीच्या परिस स्पर्शातून सर्वजण मोठे होतात. तो पत्रकार मागे राहतो. कुटुंबियाची कधी कधी वाताहत होते. आताची पिढी घडली तर पुढची पिढी पुढे जाणार आहे. समाजाचे प्रश्न, समस्या पत्रकार मांडतो. समाजाचे देणे आणि बांधिलकी म्हणून विचार करतो मात्र कुटुंबीयांकडे दुर्लक्ष होते. पत्रकारांना आधार दिल्यास त्यांना हत्तीचे बळ मिळते. शिष्यवृत्ती वाटपाच्या कार्यक्रमातून निश्चितच तो आधार मिळणार असल्याचे नितीन फलटणकर म्हणाले.

सचिन जवळकोटे म्हणाले, पत्रकारांना समाजाची चिंता आहे मात्र दुसरीकडे तो घराकडे दुर्लक्ष करतो. तो जगाची काळजी करतो मात्र कुटुंबीयांची करू शकत नाही. पत्रकाराच्या या लेखणीतून जग टिकून आहे. कुटुंबीयांनी पत्रकारांच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.

पत्रकार लेखणीतून अन्यायावर प्रहार करतात : सोमनाथ वैद्य 

पत्रकार हा समाज विकासासाठी धडपड करतो. त्यांच्या पत्रकारितेच्या आधारावरच विविध क्षेत्रातील अनेक जण उच्च पदे प्राप्त करतात. पत्रकार इतरांना मोठे करतात पण ते मागेच राहतात. आपल्या लेखणीतून ते अन्यायावर प्रहार करतात. पत्रकारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्याचा कार्यक्रम घेतल्याचे समाधान वाटते. स्वयंम शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात सामाजिक बांधिलकीतून कार्य सुरू आहे, असे स्वयंम शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी संघाच्या कार्याचा आढावा मांडला. प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांच्या पाल्यांना इयत्ता निहाय शैक्षणिक शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन दत्ता मोकाशी यांनी केले तर विजयकुमार राजापूरे यांनी आभार मानले. यावेळी विविध माध्यमांचे पत्रकार आणि पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!