धार्मिकमहाराष्ट्रसामाजिकसोलापूर

भारतात प्रथमच सोलापुरात होणार मराठीतून छत्रपती श्री शिवाजी महाराज कथा

प. पू. स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज मराठीतून करणार उदबोधन

सोलापूर : प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सात दिवसीय कथेचे मराठीतून आयोजन समस्त हिंदू समाजातर्फे भारतात प्रथमच सोलापुरात होत आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज १९ ते २५ सप्टेंबर दरम्यान दररोज दुपारी ४ ते सायंकाळी ७.३० दरम्यान जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे सोलापूरकरांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती सी. ए. राजगोपाल मिणीयार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

समस्त हिंदू समाज सोलापूरतर्फे ही विशेष पर्वणी शिवभक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेकडो वर्षे अत्याचाराने ग्रासलेला आणि गुलामगिरीत अडकलेला हिंदू समाज छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून मुक्त केला. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची महती आजवर अनेक व्याख्याने, नाटक, चित्रपट, पोवाडे अशा अनेक माध्यमांतून गायली गेली आहे. मात्र छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या महान कार्याची माहिती कथा रूपाने मराठी भाषेत सांगण्याची ही पहिलीच वेळ आहे. प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून ही कथा मराठीतून ऐकण्याची सुवर्णसंधी सोलापूरकरांसह महाराष्ट्रातील शिवभक्तांना मिळणार आहे. छत्रपती श्री शिवरायांचा जन्म, शिव संस्कार, शिवप्रताप, शिवधैर्य, शिवशौर्य, शिवचातुर्य आणि शिवविजय या सात विषयांवर सात दिवस श्री शिवचरित्रातील विविध प्रसंग प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज आपल्या ओघवत्या शैलीतून शिवभक्तांसमोर मांडणार आहेत. सोलापूर शहर जिल्ह्यासह सर्व शिवभक्तांनी या कथेस दररोज उपस्थित राहून श्री शिवचरित्र कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सी. ए. राजगोपाल मिणीयार यांनी केले.

या पत्रकार परिषदेस सी. ए. राजगोपाल मिणीयार, हेमंत पिंगळे, संगीता जाधव, सतिश सिरसिल्ला, आकाश शिरते आदी उपस्थित होते.

गुरुवारी निघणार शोभायात्रा

छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेच्या निमित्ताने पहिल्या दिवशी गुरुवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता समस्त हिंदू समाजातर्फे शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून ही शोभायात्रा छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, मेकॅनिक चौकमार्गे जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे विसर्जित होणार आहे. या शोभायात्रेत शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटना, महिला मंडळे आपल्या कला पथकांसह सहभागी होणार आहेत. शोभायात्रा कथेच्या ठिकाणी आल्यानंतर प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज शिवभक्तांना पहिला भाग सांगणार आहेत. सोलापूरकरांनी या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हेमंत पिंगळे यांनी याप्रसंगी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!