न्यायालयीन प्रक्रियेस अडथळा : मोहोळ पोलिसांविरुद्ध कारवाई बद्दल न्यायालयात अर्ज*

सोलापूर : प्रतिनिधी
न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयात आलेल्या आरोपीला न्यायालयाच्या आवारातून न्यायाधीशांच्या परवानगी शिवाय अटक केल्याने न्यायालयीन प्रक्रियेस अडथळा आणल्याबद्दल मोहोळ पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर अजय केसरकर, पोलीस ढवळे, पोलीस राठोड व सोलापूर न्यायालयातील मोहोळ पोलीस स्टेशनचे कोर्ट ऑर्डरली पवार यांचे विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, असा अर्ज आरोपीतर्फे न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
सरकार पक्षाने दिनांक १२ मार्च रोजी सदर अर्जावर म्हणणे सादर करण्याचे आदेश ॲडिशनल सेशन्स जज्ज योगेश राणे यांनी दिले आहेत. मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील सुनील घोडके खून खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधीश योगेश राणे यांच्या न्यायालयात सुरू आहे. सदर खटल्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. दि. १२.०२.२०२५ रोजी न्यायालयाने कलम ३१३ अन्वये आरोपींचा जबाब नोंदविण्या साठी तारीख नेमलेली होती. सदर तारखेस जामिनावर असणारे आरोपी रोहन एडके व अक्षय एडके न्यायालयात हजर होते. न्यायालयाचे आवारात ते हजर असताना मोहोळ पोलीस स्टेशनच्या वरील पोलीस अधिकाऱ्यांनी या दोन्हीही आरोपींना न्यायालयाची परवानगी न घेता अटक केली.
- मोहोळ पोलीस स्टेशनच्या या पोलीस अधिकाऱ्यांच्या सदरच्या बेकायदेशीर कृत्यामुळे त्या दिवशी आरोपींचा न्यायालयात जबाब घेता आला नाही त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेस अडथळा निर्माण झाला. मोहोळ पोलीस स्टेशनच्या या पोलिस अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर कृत्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याचा अर्ज वरील दोन्ही आरोपींतर्फे न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात आरोपींतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. वीरभद्र दासी हे काम पाहत आहेत.