श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे गुरुवारी पालखी मिरवणुक

सोलापूर : प्रतिनिधी
श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाच्यावर्षीही ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच गुरुवार २० जून रोजी दुपारी ४ वाजता श्री शिवराज्याभिषेक दिनी सोलापुरातून पालखी मिरवणुक काढण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे मार्गदर्शक ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास यंदा ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त राज्यभर विविध संस्था, संघटना यांच्यातर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. ३५० व्या वर्षाच्या समारोपानिमित्त देवदर्शन पदयात्रा ही पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती श्री शिवरायांनी देवदर्शन घेतले होते. या घटनेचे स्मरण म्हणून श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी दरवर्षी देवदर्शन पदयात्रा करण्यात येते. यंदाची पालखी मिरवणुक ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरापासून सुरूवात होऊन सरस्वती चौक, मेकॅनिक चौकमार्गे छ्त्रपती श्री शिवाजी महाराज चौकात समाप्त होणार आहे. या मार्गावरील मंदिरात पालखी देवदर्शनासाठी नेण्यात येणार आहे. या पालखी मिरवणूकीत लेझीम पथक, ऐतिहासिक लाठी काठीचे सादरीकरण, पारंपरिक वाद्य पथक राहणार आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम हिंदू बांधवांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्तच्या पालखी मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी यावेळी केले.
या पत्रकार परिषदेस संजय साळुंखे, ओंकार चराटे उपस्थित होते.