दरमहा आठ टक्के परताव्याच्या आमिषाने ११ लाखाला गंडविले, उत्तर कसब्यातील प्रकार

सोलापूर : प्रतिनिधी
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास महिना आठ टक्के परतावा येतो असे आमीष दाखवून ११ लाख रुपये रक्कम घेतली अन् दिलेल्या आश्वासनाप्रमाणे परताना न करता आपली फसवणूक झाल्याची तक्रार रोहित सतीश खारवे (वय ३२, रा. उत्तर कसबा, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दिली आहे. यावरून यासीन दाऊद बागवान (श्रमजीवी नगर, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. जानेवारी २०२४ ते १९ एप्रिल २०२५ या कालावधीत उत्तर कसबा परिसरात हा प्रकार घडला.
पोलिस सूत्रांनुसार, ‘यातील फिर्यादीस नमूद आरोपीने जानेवारी २०२४ ते १९ एप्रिल २०२५ या कालावधीत ओळखीचा गैरफायदा घेत विश्वास संपादन केला, शेअर-मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास महिना ८-टक्के परतावा मिळतो असे, आमिष दाखवले आणि फिर्यादीकडून नमूद रक्कम घेतली.
डिसेंबर २०२३ पर्यंत परतावा म्हणून सहा लाख रुपये दिले. त्यानंतर आजपर्यंत पैशाचा ठरल्याप्रमाणे परतावा आणि रक्कम न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सपोनि जाधव करीत आहेत.