डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले यांची बार्शी कार्यालयास सदिच्छा भेट

सोलापूर : प्रतिनिधी (बार्शी)
पत्रकारिता क्षेत्रातील भीष्म पितामह राजा माने संस्थापित, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले यांनी बार्शी येथील संघटनेच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी राज्य संघटक मुरलीधर चव्हाण, राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अजय पाटील यांच्या हस्ते विकास भोसले यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना भोसले म्हणाले कि, “राजा माने यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये चांदा ते बांदा पर्यंत अतिशय सकारात्मक, तत्पर आणि लोकशाहीला धरून काम करणाऱ्या डिजिटल मिडिया संघटनेची बांधणी करण्यात आली आहे. राज्यातील पत्रकारांच्या अडिअडचणी, न्याय व हक्कासाठी स्वतंत्र महामंडळ असावे, अशी मागणी भिलार, महाबळेश्वर येथे संपन्न झालेल्या देशातील पहिल्या अधिवेशनात केली होती. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील पत्रकारांसाठी लवकरच स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करणार असल्याचे आश्वासन दिले होते. दिलेला शब्द पाळत शासनाच्या वतीने पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची घोषणा करण्यात आली आहे. याचे सर्व श्रेय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचे आहे” असे भोसले यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे.
याप्रसंगी बार्शी तालुका अध्यक्ष धिरज शेळके, अभिजीत शिंदे, सिद्धार्थ बसवंत, किरण माने, अक्षय बारंगुळे, वैशाली ढगे, विश्वास वीर, बाळासाहेब पाटील आदी सदस्य उपस्थित होते.