चार हजार श्री सदस्य करणार रस्ते चकाचक, रविवारी आयोजन, ५५ ट्रॅक्टर ट्रॉली कचरा उचलणार

सोलापूर : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली २ मार्च रोजी सोलापूर शहरात भव्य स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. या मोहिमेत ४ हजारांपेक्षा अधिक श्री सदस्य सहभागी होणार असून ५५ पेक्षा जास्त ट्रॅक्टर व ट्रॉली या स्वच्छता अभियान मध्ये सहभागी होत आहेत.
सोलापूर शहरामध्ये २ मार्च रोजी सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान प्रमुख बाजारपेठा, भाजी मंडई, प्रमुख मार्ग अशा ठिकाणी स्वच्छता अभियान आयोजित केले आहे. प्रतिष्ठानच्या वतीने सर्व सहभागी श्री सदस्यांना मास्क व हँडग्लोज देण्यात येतात. तसेच महापालिकेच्या वतीने ही या स्वच्छता अभियानासाठी ४० घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच प्रत्येक स्वच्छता मार्गावर महापालिकेनेही आरोग्य निरीक्षकांना नियुक्त केलेले आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांचे या कार्यासाठी सहकार्य लाभत आहे.
बैठकीतून प्रबोधन
दरम्यान, डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे सेवाभावी कार्यासाठी प्रसिद्ध आहे. मानवाच्या अंतरंगातील असलेली अज्ञान व अंधश्रद्धा याचे निर्मूलनाचे कार्य जसे प्रबोधनाच्या बैठकीतून चालू आहे तसेच बाह्य जगतातील परिसर स्वच्छ व आरोग्यदायी व्हावा यासाठी प्रतिष्ठानच्या मार्फत अनेक ठिकाणी सातत्याने स्वच्छता अभियान राबविली जातात.